बहुगुणी डेस्क, वणी: घाण लागल्याचा बहाणा, क्षणभराची नजर चुकली आणि भामट्यांनी थेट 70 हजारांवर हात साफ केला! शहरातील जटाशंकर चौकातील जामनगरी स्वीट मार्टसमोर मंगळवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास ही घडली. या प्रकरणी राजेश नानाजी चौधरी (वय 59), रा. भोंगळे लेआउट, वणी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी अशाच पद्धतीचे अनेक घटना घडल्या होत्या. नवीन वर्षात देखील अशाच घटना होण्यास सुरुवात झाल्याने बँकेतून पैसे काढणा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तक्रारीनुसार, राजेश चौधरी यांनी मंगळवारी सायंकाळी सुमारे दुपारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतून 70 हजार रुपये रोख काढले होते. ही रक्कम त्यांनी एका हॅण्डबॅगमध्ये ठेवून दुचाकीने ते आवारी लेआउटकडे निघाले होते. दरम्यान, जटाशंकर चौकाजवळ एका अज्ञात इसमाने त्यांना थांबवून डोक्याला घाण लागल्याचे सांगितले. चौकात वाहतुकीची वर्दळ असल्याने त्यांनी पुढे भाजीमंडी रोडवरील जामनगरी स्वीट मार्टजवळ दुचाकी उभी केली.
यावेळी त्यांनी पैशाची हॅण्डबॅग दुचाकीच्या हॅण्डलला अडकवून ते जवळच्या किराणा दुकानातून कागद आणण्यासाठी गेले. किराणा दुकानातून त्वरित परतल्यानंतर दुचाकीवर अडकवलेली हॅण्डबॅग चोरीस गेल्याचे लक्षात आले. आसपास शोध घेऊनही बॅग मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भामट्यांपासून सावधान!
सध्या भामटे विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. कधी वाहनावर घाण लागल्याचे सांगून, तर कधी तुमची नोट रस्त्यावर पडली आहे असे अनेक कारणे देऊन नागरिकांचे लक्ष विचलित केले जाते. अशा वेळी नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी रोकड डिक्कीत ठेवू नये. दुचाकी किंवा वाहनावर बॅग अडकवून दूर जाणे टाळावे. अनोळखी व्यक्तींच्या बोलण्याला सहज बळी पडू नये. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
भामट्यांनी डोके वर काढल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने अशा भामट्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विशेषतः बँकांभोवती व वर्दळीच्या चौकात पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही थोडीशी निष्काळजीपणा टाळून सतर्कता बाळगल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल.





Comments are closed.