पुरुषोत्तम नवघरे, वणी: होळी सणानिमित्त धुलीवंदनाच्या रात्री सवारी बंगल्याजवळील जत्रा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक गुद्दलपेंडी खेळाने यंदाही वणीकरांना थराराचा अनुभव दिला. मंगळवारी (दि. 3 मार्च) सायंकाळी आयोजित या खेळाला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने मैदानावर प्रचंड गर्दी उसळली होती. या पारंपरिक खेळाचा थरार अनुभवण्यासाठी शहरातील विविध भागांतून नागरिकांनी गर्दी केली होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वणी शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष विद्या आत्राम, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, नगरसेविका अर्चना झिलपे, नगरसेवक गुलाम रसूल रंगरेज तसेच राजू भोंगळे यांच्या हस्ते नाळापूजन करण्यात आले. त्यानंतर गुद्दलपेंडीच्या सामन्यांना सुरुवात झाली. यावेळी वणीकरांनी गुद्दलपेंडी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. मात्र खेळ पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी अपुरी व्यवस्था असल्याने त्यांची काही प्रमाणात निराशा झाली.
गुद्दलपेंडीची परंपरा टिकवून ठेवण्यात शिवाजी व्यायाम शाळा आणि नृसिंह व्यायाम शाळा या जुन्या संस्थांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. अनेक दशकांपासून या व्यायामशाळा या ऐतिहासिक खेळाची परंपरा जपण्याचे काम करत आहेत. यंदाच्या आयोजनासाठी गुद्दलपेंडी आयोजन समितीने उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच पोलीस स्टेशन वणी येथे परवानगीसाठी निवेदन सादर केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबुलाल पोटदुखे, संजय शिवरात्रीवार, सूर्यकांत मोरे, अजय बोबडे, दीपक बोन्डे, दीपक पचारे, दीपक देठे, बंडू निदेकर, रमेश शर्मा, अल्ली शहा, खालीक भाई, शंकर झिलपे, सुरेश रायपुरे आणि दिलीप खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
गुद्दलपेंडी हा वणी शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग मानला जातो. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या खेळामुळे विदर्भात वणीचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या खेळात दोन खांबांमध्ये जाड दोरी (नाडा) बांधली जाते. दोरीच्या दोन्ही बाजूंना सुमारे 15 ते 20 मल्ल उभे राहून एका हाताने दोरी पकडतात. इशारा मिळताच प्रतिस्पर्ध्यांवर कमरेच्या वर ठोसे देत सामना सुरू होतो. हा सामना अत्यंत थरारक असतो. अनेक मल्ल जखमी होतात; मात्र पुन्हा शुद्धीवर येताच खेळात उतरून लढत देतात. मनगटाच्या जोरावर खेळला जाणारा हा खेळ शौर्य, परंपरा आणि धैर्याचे प्रतीक मानला जातो.



Comments are closed.