सुवर्णसंधी: प्रलंबित प्रमाणपत्रे, दाखल्यांचा निपटारा केवळ एका दिवसात
शनिवारी गणेशपूर येथील शिबिरापासून अभियानाला सुरुवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महसूल विभागाच्या पुढाकाराने वणी तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर – टप्पा १” या अभियानाची सुरुवात होत असून नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. महसूल व इतर शासकीय सेवा, प्रमाणपत्रे, 7/12 दुरुस्ती, विविध योजनांचा लाभ अनेक सुविधा एका दिवसात, एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. मार्च ते मे या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 7 मार्च रोजी गणेशपूर येथील शिबिराने या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे. त्यानंतर दर शनिवारी हे शिबिर तालुक्यात राबवण्यात येणार आहे. शिबिरात उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार निखील धुळधर यांनी केले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार वणी तालुका प्रशासनाने या शिबिरांमध्ये महसूल विभागाबरोबरच इतर शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशपूर येथे 7 मार्च रोजी पहिल्या शिबिराची सुरुवात होणार असून राजूर, रासा, भालर, पुनवट, शिरपूर, शिंदोला, कायर आणि शेवटी वणी येथे 15 मे रोजी अंतिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात केवळ प्रलंबित अर्जांची प्रत सोबत आणावी लागणार आहे.
काय मिळणार सेवा?
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, गाव नमुना 7/12 मधील चुका दुरुस्ती, डिजिटल उतारे वाटप, उत्पन्न व जातीचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी दाखले, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र यांसारख्या सेवा तातडीने दिल्या जाणार आहेत. जमीन अभिलेख अद्ययावतीकरण, अकृषिक तरतुदी, तुकडेबंदी उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, भूसंपादन व परवानगी प्रकरणे यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. सामाजिक व आर्थिक सहाय्य योजना, घरांसाठी पट्टे, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, शिधापत्रिका तयार करणे व अद्ययावत करणे यांसारख्या योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
याशिवाय आधार अद्ययावत करणे, आयुष्मान कार्ड तयार करणे, जनावरांचे लसीकरण व आरोग्य तपासणी, तसेच नेत्र, कान-नाक-घसा, अस्थिरोग व महिलांच्या आरोग्यविषयक तपासणीसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील जनतेसाठी हा उपक्रम त्वरित सेवा व समाधान देणारा ठरणार आहे. तालुक्यातील सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार निखील धुळधर यांनी नागरिकांना केले आहे.




Comments are closed.