वणीत रंगला आंतरशालेय क्रीडा व कला महोत्सव

कबड्डी, खो-खो, लंगडीसह विविध खेळ व सांस्कृतिक खेळांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगरपरिषद वणी अंतर्गत आंतरशालेय क्रीडा व कला महोत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक सातच्या मैदानावर उत्साहात पार पडला. उद्घाटन नगराध्यक्ष विद्या आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोली उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, प्रशासन अधिकारी गजानन कासावार, नगरसेविका पूजा रामगीरवार, मनोज सिडाम आणि धनराज भोंगळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली. वैयक्तिक स्पर्धांमध्ये 75 मीटर दौड, 100 मीटर दौड, लांब उडी यांसारखे खेळ रंगले. सांघिक खेळांमध्ये कबड्डी, खो-खो आणि लंगडीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. पालकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बक्षीस वितरण नगराध्यक्ष विद्या आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी सचिन गाडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राथमिक गटात नगरपरिषद शाळा क्रमांक सातने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद शाळा क्रमांक एक आणि दोन यांना मिळाले. उच्च प्राथमिक गटात विजेतेपद नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक चारने मिळवले, तर उपविजेतेपद आयोजक शाळा क्रमांक आठकडे गेले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन अधिकारी गजानन कासावार, केंद्र समन्वयक चंदू परेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा सचिव काकासाहेब जायभाये, सहसचिव अविनाश तुंबडे, आयोजक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक देवेंद्र खरवडे तसेच शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले.

Comments are closed.