BREAKING – प्लॉट विक्री फसवणुकीत विक्रेता, दलाल व अधिकारी अडकले

पत्रकारांचे ठिय्या आंदोलन, तलाठी, मंडळ अधिका-यासह चौघांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: बनावट फेरफार, सातबारा उतारा आणि खरेदी कागदपत्रांच्या आधारे प्लॉट विक्री करून ₹1.20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्लॉट विक्रेता, दलाल यांच्यासह तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचाही समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शैलेश दादाजी वाकडे (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), सतीश पुंडलिकराव केराम (रा. ओमनगर, चिखलगाव, वणी), तलाठी रविंद्र निळकंठ उपरे आणि मंडळ अधिकारी राजू निळकंठराव डोंगरे असे आरोपींची नावं असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 336(3), 340(2) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी सूरज रमेश चाटे (वय 29, रा. जत्रा रोड, वणी) हे खासगी नोकरीसोबत पत्रकारिता करतात. जुलै 2024 मध्ये मौजा वडगाव (धं) येथील अकृषक गट क्रमांक 15/1-अ मधील प्लॉट क्रमांक 30 विक्रीस असल्याचे आरोपी सतीश केराम यांनी सांगितले. संबंधित प्लॉट शैलेश वाकडे यांच्या नावावर असल्याचे सांगत फेरफार क्रमांक 1539, सातबारा उतारा आणि नकाशा दाखविण्यात आला. यानंतर सूरज चाटे आणि त्यांचे परिचित संजय तरवटकर यांनी कागदपत्रांच्या सत्यतेबाबत तलाठी रविंद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रे खरी असल्याचे सांगून विश्वास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कागदपत्रांवर विश्वास ठेवल्यानंतर 19 जुलै 2024 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, वणी येथे प्लॉट खरेदीचा व्यवहार पार पडला. या व्यवहारात सूरज चाटे आणि संध्या संजय तरवटकर यांनी प्रत्येकी ₹60 हजारांचे धनादेश देऊन एकूण ₹1.20 लाख अदा केले. तसेच दलाली म्हणून आरोपी सतीश केराम यांनी ऑनलाइन ₹10 हजार घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मोजणीदरम्यान फसवणूक उघड
प्लॉट खरेदीनंतर सप्टेंबर 2024 मध्ये चाटे आणि तरवटकर यांनी प्लॉटची मोजणी करण्याचे ठरवले. त्यावेळी शेजारील व्यक्तीकडून संबंधित प्लॉट हा दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. यानंतर त्यांनी आरोपी सतीश केराम याच्याकडे विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

काही दिवसांनी तलाठी रविंद्र उपरे यांनी फिर्यादीला कार्यालयात बोलावून “ही बाब कुठेही सांगू नका, तुमचे पैसे परत मिळवून देतो,” असे सांगितले. त्याचवेळी फेरफार क्रमांक 1539 हा बनावट असल्याचेही त्यांनी कबूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर महसूल विभागात सुनावणी होऊन फेरफार क्रमांक 1539 आणि 1561 रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले. या आदेशाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्यात आले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनीही उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला.

पत्रकारांचे ठिय्या आंदोलन
एका सहकारी पत्रकाराची फसवणूक झाल्याने आणि या प्रकरणात अनेक महिन्यांपासून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वणीतील पत्रकारांनी गुरुवारी (15 मे) पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तब्बल तीन तास पत्रकारांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडून निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान आमदार संजय देरकर तसेच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली.

अखेर वाढता दबाव लक्षात घेता पोलिसांनी प्लॉटचा कथित मालक शैलेश दादाजी वाकडे (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), मध्यस्थी सतीश पुंडलिकराव केराम (रा. ओमनगर, चिखलगाव, वणी), तलाठी रविंद्र निळकंठ उपरे व मंडळ अधिकारी राजू निळकंठराव डोंगरे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 336(3), 340(2) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.