विवेक तोटेवार, वणी: शहरातील एसपीएम शाळेमागील परिसरातून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह दोन युवकांना अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात आणखी एक महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 7.54 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
14 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत सौरभ दिनेश खैरे (वय 25, रा. तेली फेल, वणी) आणि प्रथमेश विनोद गुंडेवार (वय 20, रा. भाग्यशाली नगर, वणी) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या झडतीत 5 ग्रॅम 11 मिलिग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज आढळून आले होते. या कारवाईत सुमारे ₹59,370 किमतीचे अमली पदार्थ, एक मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण ₹1,63,790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
दरम्यान, अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली असता अक्षय उर्फ गोलू माधव पेचे (वय 27, रा. बरोरा, जि. चंद्रपूर) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच तो वणी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.
वणी शहरात शोध घेत असताना अखेर अक्षय उर्फ गोलू पेचे पोलिसांच्या हाती लागला. त्याची कायदेशीर अंगझडती घेण्यात आली असता त्याच्याकडे 7.54 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे ₹52,780 असून त्याच्याकडील ₹15,000 किमतीचा अँड्रॉइड मोबाईलही पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत एकूण ₹67,780 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून ड्रग्ज पुरवठा साखळीतील आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोउपनि सुयोग महापुरे, पोउपनि साजिद सय्यद, पोलीस अमलदार गणेश मेश्राम, मोनेश्वर खंडारे, नंदकुमार पुष्पलवार, निलेश आडे व शाम राठोड यांनी सहभाग घेतला


Comments are closed.