विवेक तोटेवार, वणी: गणेशपुर येथील एका मेहनती आणि शांत स्वभावाच्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेरू सहारे (वय 38) हे गणेशपुर येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. खाजगी वाहन चालक म्हणून काम करत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी घरातील इतर सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या वेळी शेरू सहारे घरी एकटेच होते. याच दरम्यान त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ धावपळ करून मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
शेरू सहारे हे मेहनती, मनमिळावू आणि शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत दुःख व्यक्त केले.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.


Comments are closed.