बारमध्ये गेला ‘हलका’ होण्यासाठी, चोरट्याने दुचाकीच केली ‘लंपास’

एमआयडीसी परिसरातील बारसमोरील घटना; मद्यपी दहशतीत !

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसभराच्या थकव्या नंतर “थोडा हलका होतो” म्हणत बारमध्ये गेलेल्या एका युवकाची दुचाकी चोरट्याने लंपास केली. वणीच्या एमआयडीसी परिसरात 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे मद्यपीमध्ये दहशत निर्माण झाली असून पायी जावे, बंद करावी की घरीच हलके व्हावे असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

फिर्यादी तरुण (वय 27, रा. शेलू) हा शेतमजूर आहे. तो कामासाठी नेहमी गावातील एका मित्राची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 29 CG 9625, किंमत ₹60,000) वापरतो. 21 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता तो दुचाकी घेऊन चिमूर येथे गेला होते. संध्याकाळी परत आल्यावर त्याने दुचाकी बारच्या बाहेर लावली आणि हलके होण्यासाठी आत गेला.

काही वेळाने बाहेर आल्यावर दुचाकी गायब होती. तरुणाने परिसरात विचारपूस केली, गावाजवळ शोध घेतला; मात्र दुचाकीचा थांगपत्ता लागला नाही. अखेर 23 ऑक्टोबरला त्याने वणी पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली. वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात बीएनएस कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.