बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. आज रविवारी दि. 8 मार्च रोजी दुपारच्या सुमारास रामघाट परिसरात ही घटना उघडकीस आली. समीर रमेश थोरात (वय अंदाजे 21) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत समीर थोरात (21) हा त्याच्या कुटुंबीयांसोबत वणीतील खडबडा मोहल्ला येथे राहत होता. तो 2 मार्चपासून तो घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र मुलगा आढळला नाही. अखेर त्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दिली.
त्याचा शोध सुरू होता. दरम्यान आज रविवारी (दि. 8) दुपारी खडबडा मोहल्ला परिसर जवळच असलेल्या निर्गुडा नदीकाठी असलेल्या रामघाट परिसरातील झुडपात एका झाडाला एक गळफास घेतलेला मृतदेह काही लोकांना आढळला. वणी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सदर मृतदेह समीरचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. समीरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे समीरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



Comments are closed.