नगरपरिषद शिक्षकांची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध विषयांवर विचारमंथन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगरपरिषद अधिनस्त शाळांमधील सर्व शिक्षकांची शिक्षण परिषद सोमवार, 7 सप्टेंबर रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8, वणी येथे उत्साहात पार पडली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद अध्यक्ष विद्या आत्राम होत्या. कार्यक्रमाला नगरपरिषद उपाध्यक्ष राकेश बुगेवार, शिक्षण सभापती सोनाली निमकर, महिला व बालकल्याण सभापती रीता पहापळे, प्रभाग क्रमांक 12 च्या नगरसेविका पूजा रामगिरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून वणीतील आयुर्वेदाचार्य डॉ. सुवर्णा चरपे उपस्थित होत्या.

शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी चंदु परेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षकांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली. शिक्षण परिषदेत ‘माझी शाळा, माझे उपक्रम’, ‘माझी आरोग्यदायी शाळा’, बदललेला नवीन अभ्यासक्रम तसेच ऑनलाइन कामकाजात येणाऱ्या अडचणी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शक विजय चव्हाण, सुनीता जकाते आणि निलीमा राऊत यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मार्गदर्शनानंतर शिक्षकांनी विविध विषयांवर साधक-बाधक चर्चा करत आपले अनुभव आणि अडचणी मांडल्या. बदलत्या शैक्षणिक पद्धती, नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी तसेच शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश तुंबडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक देवेंद्र खरवडे यांनी केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी किरण जगताप, दीपक भोयर आणि निशा कावडे यांनी परिश्रम घेतले. वंदे मातरम् गीताने शिक्षण परिषदेची सांगता झाली.

Comments are closed.