कोळसा वाहतुकीला शिस्त; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

आमदार देरकरांचा अॅक्शन मोड, प्रथम समज, नंतर कारवाई

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालपुलिया परिसरातील कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी आमदार संजय देरकर यांच्या अध्यक्षतेखाली वणी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोळसा प्लॉटधारक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, ढाबा चालक तसेच अन्य व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत रस्त्यावर साचणारी माती, धुळीचा त्रास, वाहतूक कोंडी आणि कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार देरकर यांनी रस्त्यावर साचलेली माती तातडीने साफ करण्याचे निर्देश दिले. तसेच वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ठिकाणी ब्रेकर बसवण्याची सूचना केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून कोळसा रस्त्यावर पडू नये आणि धुळीचा त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक ट्रकवर ताडपत्री व्यवस्थित बांधणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्लॉटधारकांनी ताडपत्री व्यवस्थित बांधल्याची खात्री केल्यानंतरच ट्रक परिसरातून बाहेर सोडावा, अशी अट घालण्यात आली. संबंधित ट्रकची बिल्टीदेखील त्याच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.

आमदार देरकर म्हणाले, “व्यवसाय करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रथम समज द्या; मात्र वारंवार उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई करा. कोळसा वाहतूक सुरू राहणे आवश्यक आहे, पण नागरिकांना त्रास होता कामा नये. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेला सर्वांनी प्राधान्य द्यावे.”

बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी, ठाणेदार भानुदास पिदुरकर, ट्राफिक पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्यासह गणपत लेडांगे, अजय ढोबे, मनीष बत्रा आदी उपस्थित होते. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे कोळसा वाहतुकीला शिस्त लावण्यासोबतच व्यावसायिकांचे हित आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Comments are closed.