Update – वृद्धाचा अपहरण करून निघृण खून, सर्व आरोपी जेरबंद

'शिंदे'शाही ! चार दिवसांत गुह्याची उकल, आरोपींच्या हाती बेड्या...

बहुगुणी डेस्क, वणी: विवाहित महिलेला प्रेमसंबंधात अडकवून पळवून नेल्याच्या सूडभावनेतून एका युवकाच्या वृद्ध वडिलांची निघृण हत्या करणाऱ्या तीन आरोपींना शिरपूर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत जेरबंद केले. अपहरण आणि खून प्रकरणात पतीसह नातेवाईक आणि वाहनचालकाचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, यवतमाळ एमआयडीसी परिसरातून गुन्हेगारांना उघडकीस काढण्यात पोलिसांना यश आले. हे प्रकरण प्रेम, सूड आणि हिंसेच्या काळिमाने गुंफलेल्या कथेचे रूप घेत असून, तपासात अजूनही नवीन धागे समोर येत आहेत.

प्रेमसंबंधातून सुरुवात…
भद्रावती तालुक्यातील जुना सुमठाना येथील रहिवासी असलेल्या आरोपीची पत्नी चार महिन्यांपूर्वी गावातीलच नितेश विनायक कुडमेथे याने पळवून नेली. पत्नीच्या बेपत्ता अवस्थेने संतप्त झालेल्या आरोपी नितेशच्या कुटुंबीयांकडे याबाबत चौकशी करत होता. संयमाचा बांध फुटताच त्याने सूडभावनेतून नितेशचे वडील विनायक माधव कुडमेथे यांचे अपहरण केले. ५ ऑक्टोबर रोजी वणी शहरातील यवतमाळ रोडवरील एका किराणा दुकानासमोरून विनायक कुडमेथे यांचे अपहरण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी बेलोरा फाटा बसस्थानकाजवळ त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मृताच्या दहा वर्षीय नातवाने रडत घरी येताच ही घटना उघडकीस आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तगडी पोलिस कार्यवाही!
शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये मृताच्या मुलीने तक्रार दाखल केली. शिरपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत युद्धपातळीवर तपास सुरू केला. ठाणेदार माधव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खबरी यंत्रणा अलर्ट करून विशेष पथक गठित केले गेले. आरोपींच्या लोकेशनचा ट्रेस करताना यवतमाळ एमआयडीसी परिसरात लपले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी पोलिस पथकाने छापा टाकून मुख्य आरोपी निलेश दिलीप ढोले (36, रा. जुना सुमठाना, भद्रावती), सहभागी आशिष मारोती नैताम (35, रा. सास्ती गवरी, ता. राजुरा) आणि वाहनचालक मिथिलेश बिंदेश्वर जाधव (55, रा. मोरवा, जि. चंद्रपूर) यांना अटक केली. आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असून, तपासात प्रेमसंबंधाच्या पार्श्वभूमीतील सूडभावना स्पष्ट झाली आहे.

प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक व एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार माधव शिंदे, सपोनि रावसाहेब बुधवंत आणि त्यांच्या पथकाने केला.

Comments are closed.