संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मानले ‘देवा’भाऊंचे आभार

शेतकऱ्यांच्या हाकेला सरकारचा प्रतिसाद – बोदकुरवारांचे आभार

बहुगुणी डेस्क, वणी: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने तब्बल ₹31,628 कोटींच्या मदतीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वणी, झरी जामणी आणि मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलूरकर, संजय पिंपलशेंडे, माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर, दिनकर पावडे, गजानन विधाते, शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, प्रा. महादेव खाडे, मीरा पोतराजे आणि नितीन वासेकर उपस्थित होते.

बोदकुरवार म्हणाले की, शेतकऱ्यांना हेक्टरनिहाय थेट आर्थिक मदत देण्याचा ‘न भूतो न भविष्यती’ निर्णय सरकारने घेतला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना ₹18,500, हंगामी बागायतींना ₹27,000 आणि बागायती शेतकऱ्यांना ₹32,500 इतकी मदत मिळणार आहे. मदतीची मर्यादा 2 वरून 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पिकविमा घेतलेल्या 45 लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹17,000 अतिरिक्त मदत देण्यात येणार आहे. दरड कोसळणे, नदीपात्र बदलणे किंवा जमिन वाहून जाणे यामुळे नुकसान झाल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांना ₹47,000 प्रति हेक्टर मदत मिळणार आहे. गाळ साचलेल्या जमिनीसाठी ₹18,000 प्रति हेक्टर अशी तरतूद करण्यात आली आहे.

घरांचे व संपत्तीचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांतून थेट आर्थिक मदत दिली जाणार असून, पडझड झालेल्या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून नवीन घरे मिळतील. दुकान, झोपडी, गोठे, भांडी-कपड्यांचे नुकसानही सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार भरून काढले जाणार आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी महसूलात सूट, पिककर्ज पुनर्गठन, एक वर्षाची वसुली स्थगिती, तिमाही वीजबिल माफी, शाळा-परिक्षा शुल्क सवलत, रोहयोतील शिथिलता आणि शेतीपंप जोडणी न तोडण्याचा आदेश देत आणखी दिलासादायक निर्णय घेतले आहेत.

राज्यातील कोणत्याही सरकारने यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर मदत दिली नव्हती. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. याप्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि महायुती सरकार हे शेतकरी हित जोपासणारे असल्याचे स्पष्ट केले.

Comments are closed.