वणीमध्ये पाणी प्रश्नाचे काम युद्धपातळीवर सुरु
गिरीष कुबडे, वणी: वणी शहराची तहान भागविण्यासाठी वर्धानदीच्या रांगणा डोहातून निर्गुडा नदीच्या पात्रारात पाणी घेण्यासाठी सरकार कडून १५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या कामाला १८ एप्रिल पासून युद्धपातळीवर सुरवात झाली आहे. ११७६० मीटर असलेल्या खोदकामापैकी ७00 ते ८०० मिटर खोदकाम पूर्ण झाले. तसंच पाईप टाकण्याचे काम सुद्धा चालू झाले आहे. अशी माहिती संबंधित कंत्राटदाराने दिली आहे.
संपूर्ण पाईप लाईन खोदून पाईप टाकण्याची प्रक्रिया हि येत्या २० तारखेपर्यत पूर्ण करण्यात येईल असे मत कंत्राटदारानी व्यक्त केले. त्यामुळे वणीकरांची तहान लवकरच भागवली जाणार असं दिसून येत आहे. पाईपाचे खेप वणीच्या पाईंटवर तसेच रांगणा घाटाच्या पाईंटवर टाकण्याचे काम तसेच खोदकामाला मोठ्या युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.
याकामासाठी एक जे.सी.बी, एक पोकल्यान्ड आणि एक हायड्रा अशा तिन्ही मशिनी दोन्ही पाईंटवर प्रत्येकी एक ठेवण्यात आली आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी रात्र- दिवस काम करून पाणी पोहचविण्याची धडपड करीत असल्याने वणीत २० एप्रिल पर्यत निर्गुडा नदीच्या पात्रात पाणी पोहचेल असे चित्र दिसत आहे.