जितेंद्र कोठारी, वणी: दीपक चौपाटी परिसर सध्या मटका पट्टीचा क्रमांक एकचा अड्डा बनला आहे. गेल्या आठवड्यात या परिसरातील 3 ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली होती. आता शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी पुन्हा या परिसरातील दोन ठिकाणी धाड टाकत 3 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या सोबतच राजूर येथे देखील वणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत एक व्यक्ती पोलिसांच्या हाती आला आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना ही जत्रा मैदान येथी आहे. शनिवारी दिनांक 14 जानेवारी रोजी जत्रा मैदान परिसरातील नगर परिषद कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस मटका सुरू असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. त्यावरून या ठिकाणी पोलीस गेले असता तिथे लोकांची गर्दी आढळून आली. सदर ठिकाणी एक व्यक्ती मटका घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली असता तिथे एकच पळापळ झाली. मात्र मटका घेणारा पोलिसांच्या हाती आला. या प्रकरणी पोलिसांनी गोपाल नामक एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 1340 रुपये व मटका लावण्याचे साहित्य (पट्टीबूक, कार्बन तुकडा, पेन इ.) जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीला विचारणा केली असता त्याने सदर मटका हा गौतम झाडे नामक व्यक्तीचा असून या व्यक्तीकडे 300 रुपये रोजीने काम करीत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यावरून दोन्ही आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी धाड ही दीपक चौपाटीजवळील खुल्या जागी मारण्यात आली. या धाडीत पोलिसांनी विक्की नामक एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मटका लावण्याचे साहित्य व 1050 रुपये जप्त करण्यात आले. त्याला पोलिसांनी मालकाचे नाव विचारले असता त्यासाठी त्याने असमर्थता दर्शवली. सदर मटका पट्टीचा मुख्य चालक कोण आहे याचा वणी पोलीस तपास करीत आहे.
राजूर येथेही पोलिसांची धाड..
पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना राजूर येथील आठवडी बाजार परिसरात मटका सुरू असल्याची माहिती खब-याकडून मिळाली. दुपारी 4 वाजताच्या सुमारात सदर ठिकाणी पोलीस गेले असता त्यांना देवीच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती मटका घेताना आढळला. पोलिसांनी लपतछपत जाऊन धाड टाकली असता तिथला एक व्यक्ती त्यांच्या ताब्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी किशोर नामक एकाला ताब्यात घेतले त्यांच्याकडून मटका लावण्याचे साहित्य व 620 रुपये जप्त केले.