जितेंद्र कोठारी, वणी: मंदर येथील मार्कंडेय पोदार स्कूल येथे 12 व 13 जानेवारी रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनीत पर्यावरण या विषयावर मॉडेल सादर करायचे होते. यात परसोडा येथील अ.जा. मुलांची निवासी शाळा येथील कार्यरत प्रयोगशाळा सहायक विलास जाधव यांच्या टायगर प्रोटेक्शन कोट या मॉडेलला प्रथम बक्षिस मिळाले. गटशिक्षण अधिकारी यांच्या हस्ते जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
वणी तालुक्यात अलिकडे वाघाने दहशत निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांआधीच वाघाने दोन व्यक्तींची शिकार केली होती. तर एका हल्ल्यात एक मजूर थोडक्यात बचावला होता. सातत्याने होणारे वाघाचे हल्ले ही गंभीर बाब लक्षात घेऊन विलास जाधव यांनी टायगर प्रोटेक्शन कोट तयार केला. अतिशय कमी खर्चात तयार केलेला हा कोट विशेषता शेतकरी व शेतमजुरांसाठी आहे. हा कोट घालून असताना वाघाचा हल्ला झाला, तर हा कोट गंभीर दुखापत होण्यापासून बचाव करतो. या कोटमुळे शेतकरी शेतमजुरांचा वाघाच्या हल्ल्यापासून जीव देखील वाचू शकतो, असा दावा विलास जाधव यांनी केला आहे.
विलास जाधव यांनी केलेल्या या कोटची विज्ञान प्रदर्शनीत चांगलीच चर्चा झाली. उपस्थित मान्यवरांनी या कोटचे चांगलेच कौतुक केले आहे. या कोटमध्ये आणखी संशोधन करून शेतकरी शेतमजुरांच्या सेवेत दाखल करणार अशी प्रतिक्रिया विलास जाधव यांनी दिली. त्यांच्या या टायगर प्रोटेक्शन कोटची परिसरात चांगलीच चर्चा होत असून याच्या डेमोस्ट्रेशनचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विलास जाधव हे दरवर्षी नवनवीन मॉडेल विज्ञान प्रदर्शनीत सादर करतात. यांच्या विज्ञान प्रदर्शनीतील मॉडेलला या आधीही जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
https://youtu.be/vKXR0Bk0VvM
