वणीतील सिंधी कॉलनीतून शहरभर बेकायदेशीर तंबाखूचा पुरवठा

पोलीस स्टेशनच्या हाकेवरच अवैध धंदा; कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री सुरू असून धक्कादायक बाब म्हणजे हा बेकायदेशीर व्यवसाय थेट पोलीस स्टेशनपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सिंधी कॉलनीतून चालविला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातूनच अवैध तंबाखूचा पुरवठा होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेची पुरती चेष्टा होत असल्याचे चित्र आहे.

सिंधी कॉलनीतील एका दुकानातून प्रतिबंधित तंबाखू खुलेआम विकली जात असून या दुकानचालकावर यापूर्वीही वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल होऊन कारवाई करण्यात आली आहे. मात्र वारंवार कारवाई होऊनही व्यवसाय बिनधास्त सुरूच असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बेकायदेशीर तंबाखूचा पुरवठा शहरातील विविध भागांत होत असून तरुणांसह अल्पवयीन मुलांपर्यंतही तंबाखू सहज पोहोचत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने संतापाची लाट उसळली असून तात्काळ कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान, 8 डिसेंबर रोजी शहरात पोलिसांनी सुगंधित तंबाखू जप्त करत कार्यवाही केली होती. मात्र या कारवाईनंतरही शहरातील पुरवठा थांबला नाही. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण देणाऱ्या या तंबाखू विक्रीकडे अन्न व औषध प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तंबाखू विक्रेते वणी शहरात कॅन्सरचा ‘दीपक’ पेटवत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. कधी लहान व्यावसायिक असलेला हा तंबाखू विक्रेता आज अवैध व्यवसायातून लाखोंची उलाढाल करत असताना त्याच्यावर कारवाई का होत नाही? पोलीस प्रशासनानेच या बेकायदेशीर धंद्याला मूकसंमती दिली आहे का? असा थेट सवाल आता वणीकर विचारू लागले आहेत.

Comments are closed.