बहुगुणी डेस्क, वणी: प्रेस वेलफेअर असोशिएशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात एसपीएम विद्यालयाने पूर्व माध्यमिक गटात तर स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकावला. सलग चौथ्यांदा स्वर्णलीलाने ही कामगिरी करून स्पर्धेत आपली चमक दाखवली.
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल वीस शाळांच्या चमूंनी रंगतदार नृत्य सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ठाणेदार गोपाल उंबरकर, अध्यक्ष अनिल बिलोरीया यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष विद्या सचिन आत्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तुषार अतकारे व गजानन कासावार यांनी केले.
पूर्व माध्यमिक गटात शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. संताजी इंग्लिश मिडियम स्कूलने द्वितीय क्रमांक, जनता विद्यालयाने तृतीय क्रमांक तर नगर परिषद शाळा क्रमांक सातने प्रोत्साहनपर बक्षीस पटकावले. माध्यमिक गटात स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला. विवेकानंद विद्यालयाने द्वितीय, वणी पब्लिक स्कूलने तृतीय क्रमांक तर शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाने प्रोत्साहनपर बक्षीस मिळवले. दिव्यांग गटात रामदेवबाबा मुक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
स्पर्धेदरम्यान विजय चोरडिया, संजय खाडे, किरण दिकुंडवार, विजय महाले, संजय निमकर, निकेत गुप्ता, दीपक मत्ते, डॉ. गणेश लिमजे यांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रवि बेलुरकर यांचा गौरव करण्यात आला. बक्षिस वितरण आमदार संजय देरकर व शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के यांच्या हस्ते पार पडले. परीक्षण प्राचार्य हेमंत चौधरी व नृत्य दिग्दर्शिका आस्था दहेकर यांनी केले. आभार प्रदर्शन विनोद ताजने यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सचिव सागर बोढे, उपाध्यक्ष रमेश तांबे, सहसचिव जितेंद्र डाबरे, किशोर चवने, मंगल तेलंग, सुरज चाटे, बंडू निंदेकर, पुरुषोत्तम नवघरे, लोकेश गुंडलवार, सुनील पाटील, रज्जाक पठाण, महादेव दोडके यांनी परिश्रम घेतले. फिरता करंडक स्व. ऋषी पिदूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ योगेश पिदूरकर यांनी प्रायोजित केला. पूर्व माध्यमिक व माध्यमिक गटातील विजेत्या शाळांना चषक स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खासदार प्रतीभा धानोरकर यांनी प्रायोजित केला.
ही स्पर्धा केवळ नृत्याचा उत्सव ठरली नाही तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी आणि शाळांमध्ये सर्जनशीलतेची नवी ऊर्जा निर्माण करणारी ठरली.





Comments are closed.