प्लॉटच्या वादातून दोन वृद्धांची एकमेकांना काठीने मारहाण

“जागा माझी की तुझी?” यावरून वाद... दोन्ही बाजूंवर गुन्हा

बहुगुणी डेस्क, वणी: प्लॉट व घराच्या जागेच्या वादातून दोन ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र वाद होऊन हा वाद हाणामारी पर्यंत पोहोचला आहे. मारेगाव तालुक्यातील चोपण येथे 24 जानेवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल करण्यात आल्या असून, परस्परविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पहिल्या तक्रारीवरून, नरेश विठु गुरुनुले (वय 68, रा. चोपन) यांनी सन 2014 मध्ये कर्ण उरकुरा चाहारे (वय 60) यांच्याकडून एक प्लॉट खरेदी केला होता. मात्र अनेक वर्ष झाले तरी प्लॉटची अधिकृत विक्री नोंदणी करून देण्यास कर्ण चाहारे टाळाटाळ करत होते. याच विषयावरून 24 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास कर्ण चाहारे यांच्या घरी चर्चा करण्यासाठी गेले असता, त्यांच्यात वाद झाला. यावेळी कर्ण चाहारे यांनी घरातून वेळवाची काठी आणून नरेश गुरुनुले यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. बचाव करताना गुरुनुले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यानंतर पुन्हा आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, कर्णुजी उरकुरा चाहारे (वय 73) यांनीही मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नरेश गुरुनुले हे त्यांच्या घरी आले. त्यांनी कर्णुजीला माझ्या मालकीच्या जागेवर तुझ्या बांधकामाचे साहित्य का ठेवले असे विचारले. त्यावर कर्णुजी यांनी माझ्याच जागेवर साहित्य असून ती माझीच जागा आहे. यावर गुरुनुले यांनी कर्णुजी यांना शिवीगाळ सुरू केली. यावेळी गुरुनुले यांनी वेळवाच्या काठीने डोक्यावर मारहाण केल्याने कर्णुजी चाहारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच बांधकाम साहित्य काढून टाकले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधात बीएनएस कलम 118(1), 3(5), 351(2) व 351(3) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

मोबाईलवर बोलते म्हणून पत्नीवर संशय – दुस-या लग्नाची धमकी

Comments are closed.