रा.स्व.संघाचे वणी येथे शताब्दी वर्षानिमित्त भव्य पथसंचलन

250 स्वयंसेवकांचा सहभाग, मुसळधार पावसातही उत्साह कायम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने वणी शाखेच्या वतीने भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या संचलनात वणी नगरातील 12 वस्त्यांमधून एकूण 250 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

पथसंचलनाच्या दिवशी विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत असतानाही स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात शासकीय मैदानावर एकत्र येत उत्साहाने सहभाग नोंदवला. घोषपथकाच्या निनादात शिस्तबद्ध पद्धतीने निघालेले संचलन टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, नृसिंह व्यायाम शाळा, दीपक चौपाटी, भगतसिंग चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक मार्गे पुन्हा शासकीय मैदानावर येऊन समाप्त झाले.

या प्रसंगी तालुका संघचालक हरिहर भागवत आणि शहर संघचालक किरण बुजोने यांनी पथसंचलनाचे निरीक्षण केले. मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुष्पवर्षाव करत स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सहकार्यवाह कवडू पिंपळकर यांनी मुख्यशिक्षक म्हणून यशस्वीपणे पार पाडले.

Comments are closed.