बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 मध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. राणी लक्ष्मीबाई आत्मसुरक्षा योजनेअंतर्गत आयोजित या उपक्रमात शहरातील तेजस्विनी राजू गव्हाणे यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले.
सध्याच्या परिस्थितीत मुलींनी आत्मसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींना जुडो, कराटे तसेच विविध आत्मसंरक्षणाच्या तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमाबद्दल पालकांनी तेजस्विनी गव्हाणे यांचे कौतुक केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनीषा शिवरकर, उपाध्यक्ष कार्तिक रुईकर, प्रशासन अधिकारी गजानन कासावार, प्र. मुख्याध्यापक देवेंद्र खरवडे व शिक्षकवृंद यांनी यावेळी तेजस्वीनीचा सत्कार केला. शाळेत नियमितपणे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम राबविले जात असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती मुख्याध्यापक देवेंद्र खरवडे यांनी दिली.



Comments are closed.