वणीत शिवजन्मोत्सवाची भव्य शोभायात्रा; जयघोषाने दुमदुमले शहर

ढोलताशांचा गजर, पुष्पवृष्टी, मर्दानी आखाड्याचे प्रात्यक्षिक आणि तरुणाईचा उत्साह

पुरुषोत्तम नवघरे, वणी: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ, वणी यांच्या वतीने आयोजित भव्य शोभायात्रा शहरात जल्लोषात पार पडली. वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायंकाळी 5 वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला आणि संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले.

शोभायात्रेत महाराजांची आकर्षक प्रतिमा, डोलणारे भगवे ध्वज, ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमणारे वातावरण आणि महिला भजन मंडळाच्या अभंग-भजनांनी शिवमय उत्साहाची अनुभूती दिली. “छत्रपतींच्या जयघोषात” तरुणाईचा जोश ओसंडून वाहत होता. शांतीदूत मर्दानी आखाड्याने सादर केलेली थरारक व कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके हे विशेष आकर्षण ठरले. तसेच साउंड सिस्टीम व डीजेच्या तालावर युवक-युवतींनी जल्लोषपूर्ण सहभाग नोंदवला. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत शोभायात्रेचे स्वागत केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि शांततेत पार पडलेली मिरवणूक यामुळे आयोजकांचे सर्वत्र कौतुक झाले. “आदियोगी” देखावा हा यंदाच्या शोभायात्रेचा खास आकर्षणबिंदू ठरला. या प्रसंगी शहरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. शिवजयंतीच्या निमित्ताने इतिहासाचे स्मरण करून देत स्वराज्य, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक एकतेचा संदेश या भव्य शोभायात्रेतून देण्यात आला.

Comments are closed.