वणी तालुका दुष्काळग्रस्त नाही, सरकारचा जावईशोध

शेतक-यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा

0
विवेक तोटेवार, वणी: पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील पिके करपली आहेत. शेतक-यांच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे, परंतु अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले असतानाही नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारच्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत वणी तालुक्याचे नाव नाही. यासाठी तातडीने वणी तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिका-यांना निवेदन देण्यात आले.
नुकतंच शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली. त्यात वणी जवळच्या मारेगाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त म्हणून करण्यात आला आहे. मात्र वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी वणी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात नाही. त्यामुळे पिकांचे झालेले नुकसान याची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही.
शेतक-यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून याबाबत बुधवारी निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात वणी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात केला नाही, तर तहसिल कार्यालयासमोर झरी आणि वणी तालुक्यातील शेतक-यांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…
पर्जन्यमानाच्या निकषानुसार आज वणी तालुक्यातील प्रत्येक गाव दुष्काळी आहे. मात्र वणी तालुका हा दुष्काळी नसल्याचा जावईशोध सरकारने लावला आहे. दिवाळी सण तोंडावर आहे. मात्र दुष्काळामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात 50 टक्के घट झाली आहे. आधीच हवालदिल झालेल्या शेतक-यांना भीषण पाणीटंचाई, चाराटंचाईचा सामना करावा लागणार. तरी सरकारने आधीच आवश्यक उपाययोजना कराव्यात. अन्यथा आम्ही शेतक-यांच्या प्रश्नांवर कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. जर सरकारने या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही डॉ. महेंद्र लोढा यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंगजी गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, विजयाताई आगबत्तलवार, संगीता खटोड, संदिप धवणे, अंकुश नेहारे, स्वप्निल धुर्वे, सिराज सिद्धिकी, मोहाडे, संदिप धवणे, सोनू निमसटकर, राजू उपरकर यांच्यासह राष्ट्रवादीचे झरी, मारेगाव तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिका-यांसह सुमारे दिडशे लोक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.