बहुगुणी डेस्क, वणी: गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षी झालेल्या एलएलबी अंतिम परीक्षेत हिंदू कायदा या विषयात सुवर्णपदक पटकाविण्याचा मान वणी तालुक्यातील केसुर्ली गावच्या कन्या कु. ट्विंकल सुधाकर गोहणे हिला मिळाला आहे. गडचिरोली येथे दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विशेष तेराव्या दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत तिला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
ट्विंकल गोहणे ही एका शेतकरी कुटुंबातील मुलगी असून, लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आई अलका सुधाकर गोहणे यांच्या कष्टाच्या बळावर तिने अभ्यास पूर्ण केला. शेतकरी आईच्या मेहनतीचे फळ म्हणून आज तिच्या यशाचा आनंद केसुर्ली गावातून उत्साहाने साजरा होत आहे. यशाचे श्रेय आई अलका गोहणे, भाऊ ओमकार गोहणे, कुटुंबीय आणि शिक्षकांना देऊन ट्विंकल म्हणाली, “हे यश फक्त माझे नाही, तर माझ्या आईच्या त्यागाचे आणि सर्वांच्या प्रोत्साहनाचे आहे.”
सध्या ती वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात ॲड. अविनाश बोधाने यांच्याकडे सहायक अधिवक्ता म्हणून प्रॅक्टिस करत आहे. तिच्या या कामगिरीला ॲड. अविनाश बोधाने, ॲड. कुमार मोहरमपुरी, अतुल पायघन यांसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. केसुर्ली गावाच्या या कन्येने दाखवून दिले की, मेहनत आणि जिद्द असेल तर छोट्या गावातूनही मोठे यश मिळू शकते!



Comments are closed.