विवेक तोटेवार, वणी: शहरातील टागोर चौक येथे भागवत सेवा समितीच्या वतीने 13 मार्च 2026 ते 20 मार्च 2026 दरम्यान व्यसनमुक्ती सप्ताह तसेच श्रीमद् भागवत कथेला सुरुवात होत आहे. समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालून युवकांना योग्य ते मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भागवताचार्य ह.भ.प. व्यसनमुक्ती सम्राट, महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त रामेश्वर खोड़े महाराज यांच्या ओजस्वी प्रवचनातून भागवत कथेद्वारे समाजप्रबोधन होणार आहे. त्यांच्या वाणीतून दारू, खर्रा, तंबाखू यांसारख्या व्यसनांचे दुष्परिणाम, मोबाईलचा वाढता वापर, कमी होत चाललेले कौटुंबिक संबंध यावर जनजागृती केली जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी, मारेगाव विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून त्यामागील एक कारण व्यसनाधीनता असल्याचे अधोरेखित करण्यात येणार आहे. विशेषतः युवकांना व्यसनातून मुक्त करून समाज व्यसनमुक्त करण्यासाठी या कार्यक्रमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
भागवत सेवा समितीचे अध्यक्ष रमेश येरणे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृती कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.



Comments are closed.