विवेक तोटेवार, वणी: नागरिकांमध्ये तसेच तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश जनमानसात पोहोचावा, या उद्देशाने वणी शहरात गुरुवारी, दि. 13 ऑगस्ट रोजी भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता विश्रामगृह येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या रॅलीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर अथवा झेंडे न लावता, केवळ ‘वणीकर नागरिक’ म्हणून हातात तिरंगा घेऊन नागरिक रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे रॅलीला पक्षीय राजकारणापासून दूर ठेवत राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रॅलीमध्ये वणी शहरातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पद रॅलीच्या माध्यमातून तिरंग्याप्रती असलेला अभिमान आणि देशभक्तीची भावना व्यक्त करण्यात येणार आहे.
विश्रामगृह येथून रॅलीला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक → खाती चौक → महात्मा गांधी चौक → गाडगे बाबा चौक → काठेड ऑईल मिल चौक → सर्वोदय चौक → रविंद्रनाथ टागोर चौक → डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक → लोकमान्य टिळक चौक असा रॅलीचा मार्ग राहणार आहे.
वणी तालुक्यातील नागरिक, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, धार्मिक व सांस्कृतिक संघटना तसेच युवक-युवतींनी मोठ्या संख्येने तिरंगा हातात घेऊन या रॅलीत सहभागी व्हावे आणि राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचविण्यासाठी रॅली यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments are closed.