उकणीच्या प्रश्नावर सीएमडी अॅक्शन मोडमध्ये, थेट बांधावर भेट

पूनर्वसन, मोबदला व जमीन संपादनाच्या प्रश्नांवर कार्यवाहीचे निर्देश

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या काही वर्षांपासून उकणी गावाच्या पूनर्वसनचा प्रश्न अधांतरीत आहे. याबाबत वेळोवेळी गावक-यांनी आंदोलन केले. बुधवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी वेकोलिचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. हेमंत शरद पांडे यांनी उकणी गावाला भेट देत विविध समस्यांचा आढावा घेतला. त्यामुळे पूनर्वसन, मोबदला व भूमी संपादनाचा प्रश्न सोडवण्याच्या कामाला वेग आल्याचे म्हटले जात आहे. उकणीवासीयांनी कामगार नेते संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन केले होते. सीएमडी यांच्या भेटीमुळे उकणी कोळसा खाण व पूनर्वसन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने समाधान व्यक्त केले आहे.

आज दु. 3 वाजताच्या दरम्यान सीएमडी डॉ. हेमंत पांडे यांनी सहका-यांसह उकणी येथे भेट दिली. त्यांनी गावक-यांची भेट घेत उकणीवासीयांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी संघर्ष समितीने त्यांना प्रदूषण, स्फोटांमुळे होणारे घरांचे नुकसान तसेच उर्वरीत जमीन संपादनाचा मुद्दा उपस्थित केला. डॉ. पांडे यांनी बांधावर जात अद्याप संपादन न झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी वेकोलि अधिका-यांना प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ कार्यावाही करण्याचे आदेश दिले. यावेळी कामगार नेते व एचएमएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

उकणी येथे कोळसा खाण प्रकल्पातील सुरुंग स्फोटामुळे घराला तडे गेले आहे. या भागात प्रचंड प्रदूषण आहे. त्यामुळे गावाचे सुरक्षीत व योग्य ठिकाणी पूनर्वसन करावे. घरांसाठी मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने त्याचे फेरमूल्यांकन करून बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी. तसेच उकणी खंड 1 परिसरातील 15 टक्के म्हणजे 170 शेतकऱ्यांची जमीन अद्याप संपादित केली गेली नाही. या प्रलंबित जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्वावे, इत्यादी उकणीवासीयांची मागणी आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा – संजय खाडे
सीएमडी साहेबांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली, गावकऱ्यांच्या वेदना ऐकून घेतल्या — ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. संघर्ष समिती आणि उकणीवासीयांच्या वतीने आम्ही त्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती मिळेल, आणि लवकरच आमच्या मागण्या मार्गी लागतील, अशी आम्हाला आशा आहे.”
— संजय खाडे, कामगार नेते

यावेळी संजय खाडे, अर्जून खापणे, विवेक धांडे, कुणाल बोंजे, सागर डांगे, कवडू पचारे, सुहास डाहुले, त्रिकाल ढापकस, अशोक गोवारदिपे, अक्षय ढापकस यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच उकणीवासी आणि वेकोलिचे अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.