रोजगार मेळाव्यात बच्चू कडू आक्रमक; भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी लढा

प्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी करणार दौरा

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील बेरोजगारांची माहिती संकलित करून त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात येणार असल्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. वणी येथील शेतकरी मंदिर सभागृहात मंगळवारी (दि. 11 ऑगस्ट) आयोजित प्रकल्पग्रस्त व रोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

यवतमाळ जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये कोळसा खाणींचे मोठे जाळे आहे. या खाणींसाठी स्थानिकांच्या जमिनी संपादित झाल्या असतानाही भूमिपुत्रांना अपेक्षित प्रमाणात रोजगार मिळत नसल्याची खंत कडू यांनी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यासाठी प्रशासनाकडे ठोसपणे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील बेरोजगारांची माहिती संकलित करून त्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. हे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून रोजगाराच्या प्रश्नावर पाठपुरावा केला जाईल, असे कडू यांनी सांगितले.

येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा दौरा करून प्रकल्पग्रस्त, बेरोजगार, शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रत्यक्ष भेटी घेणार असल्याचे कडू यांनी सांगितले. या दौऱ्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. मात्र, हा लढा यशस्वी करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, वणी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप कडू यांनी केला. शेतकऱ्याची जमीन वापरता येत नाही, त्यामुळे उत्पन्नाचे साधन बंद होते आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडते; मात्र त्याच परिसरातून कोळशाची वाहतूक सुरू राहते, ही परिस्थिती अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेतकऱ्याची जमीन वर्षानुवर्षे पडीत ठेवायची आणि त्याचा प्रश्न मात्र प्रलंबित ठेवायचा, हे चालणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रश्न सुटला नाही तर “वेकोलीचा एक कणही कोळसा बाहेर जाऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे वणीतील जमीन आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर आगामी काळात आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

या रोजगार मेळाव्याला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिलांनी स्वयंरोजगारासह विविध समस्या आमदार कडू यांच्यासमोर मांडल्या. महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ‘उमेद’ अभियानाशी संबंधित महिलांनीही मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्वयंरोजगार, रोजगाराच्या संधी आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगारांच्या प्रश्नांसोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मुद्दाही मेळाव्यात चर्चेत आला.

Comments are closed.