वणी ते कोरपना मार्गाला चौपदरीकरणाची गरज

लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पाठपुरावा करण्याची मागणी

जब्बार चीनी, वणी: यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वणी ते कोरपना मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी होते आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

वणी ते कोरपना हा बेचाळीस किलोमीटरचा मार्ग आहे. हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक 236 म्हणून ओळखला जायचा. करंजी-वणी-घुग्गुस हा राज्य महामार्ग क्र 6 ची निर्मिती केल्यानंतर यात वणी ते चारगाव पर्यंत चौपदरीकरण करण्यात आले. तर कुर्ली (आबई फाटा) – बोरी – कोरपना असा राज्य महामार्ग क्रमांक 374 तयार करून नवीन नियोजनात आखणी करण्यात आली.

परंतु हा रस्ता तीन राज्य महामार्गात विभागला गेल्याने त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम योग्यरित्या होत नाही. त्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत झालेली आहे. वणी ते कोरपना हा एका रेषेतील मार्ग असल्याने, घुग्घुस, गडचांदूर कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी यातील मध्यंतरीची लांबी न जोडता हा एकसंघ ठेवण्यात यावा. तसेच वणी-वरोरा मार्ग हा कोरपना पर्यंत जोडून त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

रस्त्याच्या दुर्दशेमुळे बाजारपेठ थंडावली
यवतमाळ – चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी वणी हे प्रमुख बाजारपेठ आहे. येथे कपडा, सोने-चांदीच्या आभूषणे व इतर खरेदीसाठी मोठ्या संख्येने ग्राहक येतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या, वणी – कोरपना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे , कोरपना भागा कडून येणारे सर्वाधिक ग्राहकानी वणी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. त्याचा फटका बाजार पेठेला सोसावा लागत आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

महामार्गावर जीवघेणे खड्ड्यांचे साम्राज्य
सद्यस्थितीत वणी ते कोरपना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोलगट खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूकदार व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा फटका परिसरातील सिमेंट, कोळसा, जिनिंग प्रेसिंग, गिट्टीखदान आदीच्या जड वाहतुकीला, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व आम नागरिकांनाही बसतो आहे. रस्त्यावरील वाढती रहदारी लक्षात घेता, चौपदरीकरण होणे वारंवार होणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

वणी ते कोरपना हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून अस्तित्वात आल्यास, हा मार्ग वणी पासून राष्ट्रीय महामार्ग क्र ९३० तर कोरपना येथून राजुरा – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ – बी ला कनेक्ट होईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या नियोजनात गेल्याने मुबलक निधी प्राप्त होऊन रस्ता सुस्थितीत राहील. याचा फायदा दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना कोरपना ते राज्याची उपराजधानी नागपूर पर्यंतचा थेट प्रवास करण्यासाठी सुखकर होईल.

हे देखील वाचा:

शिंदोला येथील कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला हवा मदतीचा हात

Comments are closed.