शिंदोला येथील कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला हवा मदतीचा हात

भूमिहीन शेतक-याच्या 4 वर्षीय 'युग'ची मृत्यूशी झुंज सुरू

तालुका प्रतिनिधी, वणी: जीवनाच्या वाटेवरचा संघर्ष कधी कुणाला चुकत नाही. आपल्या अवतीभवती नजर टाकली की आपल्याला थोड्याफार फरकाने सर्वांच्याच जीवनात सुखदुःखद प्रसंग आलेले दिसतात. चाक खालीवर फिरावे तसा सुखदुःखाचा फेरा चालू असतो. मनुष्य दुःखाच मळभ दूर होईल याची वाट बघत एक-एक दिवस कंठीत असतो. कठीण काळ कसोटीचे क्षण सोबत घेऊन येतो. आनंदी जीवनात आपल्या आशा – आकांशाचा चुराडा होणाऱ्या घटना घडल्या की मनुष्य हतबल होतो. असंच काहीसं संकट शिंदोला येथील अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या एका कुटूंबावर आलं आहे. संकटावर मात करण्यासाठी त्यांना गरज आहे ती आपल्या मदतीच्या हाताची.

वणी तालुक्यातील शिंदोला येथील कैलास मालेकर हे भूमिहीन शेतमजूर आहेत. शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कैलास आणि मनीषा या दाम्पत्याला चार वर्षीय युग नावाचा मुलगा आहे. या चिमुकल्याला कॅन्सरने जखडले आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने पदरमोड करून उपचार सुरू केले. गावात मदतीची हाक दिली.

हाकेला ओ देत पंचायत समितीचे सदस्य संजय निखाडे, सरपंच विठ्ठल बोंडे, सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल जैन, लुकेश्वर बोबडे, अमोल हेपट, प्रवीण पाल, सुभाष कुंडेकर आदी मंडळींच्या सहकार्याने लोकवर्गणीतून ७० हजारांच्या घरात रक्कम गोळा करून मुलाला नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एप्रिल महिन्यापासून युग नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेत आहे. त्याच्या उजव्या किडनीला कॅन्सरची बाधा झाली आहे. त्यामुळे किडनी काढली आहे.

तथापि, पुढील उपचारासाठी त्याला आणखी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे चार वर्षीय युगला वाचवण्यासाठी शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन युगच्या आईवडिलांनी केले आहे.

(कैलास वारलू मालेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा शिंदोला. खातेक्रमांक 005411002100647 आयएफएससी कोड UTIBOSYDC 54)
या क्रमांकावर मदत पाठवण्याची विनंती आहे. संपर्क क्रमांक: 6026626308

हे देखील वाचा:

निर्गुडा नदीच्या पुलावरून एका इसमाने घेतली उडी

राज जयस्वालची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Comments are closed.