बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाण परिसरात मालवाहू ट्रक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. वीरमान यादव (वय 32, रा. मध्यप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘नारायणी सन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी वेकोलिसोबत संलग्न असून ही कंपनी ओबी काढण्याचे काम करते. सोमवारी एक वोल्वो मालवाहू ट्रक डंपिंग यार्डमध्ये मुरूम माती खाली करून परत येत होता. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला आणि या अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातातील मृत चालकाचे नाव वीरमान यादव (वय 32, रा. मध्यप्रदेश) असे असून तो कंपनीत ट्रक चालक म्हणून कार्यरत होता. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर कंपनीतील इतर चालकांनी एकत्र येत मृताच्या कुटुंबीयांना कंपनीकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या अपघातामुळे उकणी खाण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (इमेज एआय जनरेटेड)


Comments are closed.