उकणी‑बेलसनी प्रकल्पग्रस्तांचा प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा

21 फेब्रुवारीला बेलोरा चेकपोस्टजवळ कोळसा वाहतूक बंद

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील उकणी‑बेलसनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. कोळसा खाण प्रकल्पामुळे जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शनिवार, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता बेलोरा गावाजवळील चेकपोस्टवर कोळसा वाहतूक बंद करण्यात येणार असून त्याच ठिकाणी आमरण उपोषण सुरू होणार आहे. याबाबतचे निवेदन वणी एरिया ऊर्जाग्राम ताडाळी येथील क्षेत्रीय मुख्यमहाप्रबंधकांना देण्यात आले आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात इशारा पत्र देण्यात आले आहे.

संघर्ष समितीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, उकणी परिसरातील सुमारे 85 टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी आधीच संपादित झाल्या आहेत. मात्र उर्वरित 170 शेतकऱ्यांच्या सुमारे 600 एकर जमिनी अद्याप संपादित झालेल्या नाहीत. खाणीतून निघणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शेतीची पोत खराब झाली असून उत्पन्नात मोठी घट झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

समितीने आपल्या मागण्यांमध्ये उकणी खंड‑1 मधील सर्व 600 एकर जमीन तातडीने संपादित करून भूधारकांना योग्य मोबदला व आश्रितांना नोकरी द्यावी, उकणी गावाची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी, 2025 च्या CSR दरानुसार घरांचे मूल्यांकन करून त्या दराने घरे बांधून द्यावीत, तसेच ज्यांची जमीन संपादित झाली आहे त्या उर्वरित 15 टक्के शेतकऱ्यांना 2016 पासून प्रती हेक्टर 5 लाख रुपये वार्षिक नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत.

“पूर्ण जमीन संपादन होईपर्यंत पुनर्वसन प्रक्रिया थांबवावी,” अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे. मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. याबाबत खासदार प्रतिभा धानोरकर यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. 

Comments are closed.