निवडणूक संपली, आता विधानसभेच्या तिकीटासाठी लढाई सुरु

लोकसभेच्या निकालाने बदलवले विधानसभेचे गणित !

निकेश जिलठे, वणी: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांचा दणदणीत विजय झाला. याचा विधानसभेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक राजकारणात वर्तवली जात आहे. लोकसभा संपल्याने आता विधानसभेच्या तिकीटासाठी स्वपक्षातच लढाई सुरु होणार आहे. भाजपने ओबीसी उमेदवार न दिल्याचा भाजपला तोटा झाला, तर काँग्रेसने कुणबी उमेदवार दिल्याचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षात कुणबी उमेदवारांचा तिकीटासाठीचा दावा वाढला आहे. मात्र नॉन कुणबी विजयाचा स्ट्राईक रेट जास्त असल्याने विधानसभेची तिकीटासाठीची इच्छुक उमेदवारांची लढाई आता चांगलीच रंगतदार होणार आहे. 

विजयाने काँग्रेसला बुस्टिंग
लोकसभेत इंडिया आघाडीला भाजपला स्पष्ट बहुमतापासून रोखण्यात यश आले. महाराष्ट्रातही काँग्रेस सर्वाधिक जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष झाला आहे. शिवाय चंद्रपूर लोकसभा देखील ताब्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना व नेत्यांना बुस्टिंग मिळाली आहे. कार्यकर्ता चार्ज झाला आहे. कुणबी उमेदवार निवडून आल्याने आता यावेळी कुणबी नेत्यांचा तिकीटावरील दावा स्ट्राँग झाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.

कुणबी व्होटरचा भाजपला फटका?
ओबीसी उमेदवार न देणे भाजपला भोवल्याचे तसेच यावेळी कुणबी व्होटर काँग्रेसकडे गेला. याचा मोठा फटका भाजपला बसला, असे बोलले जात आहे. एकीकडे लोकसभेचा पराभव त्यातच कुणबी मतदार सातत्याने काँग्रेसकडे वळत असल्याने ही भाजपसाठी एक चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे भाजपमध्ये आमदार विरुद्ध इतर कुणबी उमेदवार अशी पक्षांतर्गत संघर्ष यावेळी पाहायला मिळू शकतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मनसेची काय भूमिका राहणार?
वणीत मनसेमध्ये राजू उंबरकर यांचे एकहाती वर्चस्व आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी परिसरात कायम आंदोलन करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मनसेत इच्छकांची कोणतीही लढाई नाही. लोकसभेत राज ठाकरे यांनी विनाशर्त भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र राज्यात भाजप एकअंकी जागेवर आल्याने राज ठाकरे विधानसभेत युती करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर युती झाली तर ही तिकीट मनसेच्या क्वोट्यात येईल, अशी आशा मनसैनिकांना आहे.

शिवसेना (उबाठा) देखील दावेदार
वणी मतदारसंघ हा यवतमाळ जिल्ह्यात येतो. मात्र लोकसभेत हा चंद्रपूरमध्ये जातो. यवतमाळ वाशिम मतदारसंघात उबाठाचे संजय देशमुख यांचा विजय झाला आहे. तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा. त्यामुळे वणीत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. खा. संजय देशमुख यांच्या मदतीने वणी विधानसभेवर सेनेतील इच्छुक उमेदवार क्लेम करू शकतात. तर काँग्रेस पारंपरिक मतदारसंघ म्हणून दावा सोडणार नाही. त्यामुळे काँग्रेस की सेना आणि सेना असल्यास उमेदवार कोण? ही देखील एक रंगत यावेळी पाहायला मिळणार आहे.

वंचित, कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, संभाजी ब्रिगेड इत्यादी पक्षात इच्छुक उमेदवारांची फासशी लढाई नाही. मात्र वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार, याकडे या पक्षातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. (News Date – 09-06-24)

Comments are closed.