वणीत धावणार रेल्वे इंजिन? विधानसभा मनसेच्या क्वोट्यात?

मनसे केवळ स्टेजवर बसण्यापुरती कामात आली, आमदारांनी खोडला मनसेचा दावा

निकेश जिलठे, वणी: सध्या मनसेने महायुतीत येण्यासाठी 20 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. या यादीत वणी विधानसभा क्षेत्राचे देखील नाव आहे. त्यामुळे वणी विधानसभेची तिकीट मनसेच्या क्वोट्यात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मनसेचा कोणताही फायदा झाला नाही, त्यामुळे मनसेचा इथे दावा करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्पष्ट केली. आजच्या या राजकीय आढाव्यात राजू उंबरकर यांची राजकीय कारकिर्द व मनसेच्या दाव्यावर भाजपची भूमिका जाणून घेणार आहोत. 

मनसे महायुतीत येण्याची पार्श्वभूमी काय?
शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजप मित्रपक्ष असलेल्या सेनेची कसर भरून काढण्यासाठी प्रयत्नशील होता. ही कसर काही प्रमाणात मनसे भरून काढेल अशी आशा भाजपला आहे. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षांपासून मनसे-भाजप युतीची चर्चा सुरु झाली. पण मध्यंतरी भाजपने शिवसेना फोडत शिंदे गटाला आपल्या बाजूने वळवले. अर्ध्यापेक्षा अधिक शिवसेना भाजपसोबत आल्याने काही काळ मनसे-भाजप युतीची चर्चा काही प्रमाणात मागे पडली.

या लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र या निवडणुकीत भाजपला फटका बसत त्यांच्या जागा एक अंकी झाल्या. शिंदेच्या शिवसेनेला या लोकसभेत चांगले यश मिळाले असले, तरी भाजपच्या उमेदवारांना शिंदेच्या सेनेचा विशेष फायदा झाला नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे आणखी एक मित्रपक्ष म्हणून आता मनसे-भाजप युतीची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान मनसेने महायुतीला 20 जागांचा प्रस्ताव दिला आहे. विशेष म्हणजे यात वणी विधानसभेचा देखील समावेश आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजू उंबरकर उंबरकर यांची राजकीय सुरुवात 
विदर्भात चंद्रपूर जिल्हा, नागपूर तसेच काही ठिकाणी मनसेचे चांगले वर्चस्व आहे. मात्र मनसे सर्वात जास्त प्रभावी वणी विधानसभा क्षेत्रात आहे. राजू उंबरकर यांनी वणी विधानसभेत मनसे केवळ वाढवली नाही, तर नगरपालिकेत काही काळासाठी सत्ता देखील आणली. त्याचे फळ म्हणून राजू उंबरकर यांना मनसेच्या उपाध्यक्ष पदावरून नेते पदी बढती मिळाली. 

सुरुवातीच्या काळात वणीतील मनसे विद्यार्थी सेनेतून पुढे आलेले व त्या काळी राज ठाकरे यांचे निवटवर्ती असलेले मनिष सुरावार यांच्या ताब्यात होती. त्याच काळात राजू उंबरकर हे मनसेशी जुळले व त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली. मात्र काही काळानंतर उंबरकर यांनी सुरावार यांचा पत्ता कट करत मनसेच्या वणी विधानसभा क्षेत्रात आपले एकहाती वर्चस्व निर्माण केले.

नेतृत्त्वाला विविध आंदोलनाची जोड
राजू उंबरकर यांनी शहरातील भीषण पाणी समस्या, रोजगार, आरोग्य इत्यादी लोकांच्या समस्या उचलल्या. विविध आक्रमक आंदोलन, जनसंपर्क, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम याचा त्यांना चांगला फायदा झाला. त्यामुळे ते विधानसभा क्षेत्रात एक नवीन नेतृत्व म्हणून उदयास आले. 2009 च्या विधानसभेत उभे राहून त्यांनी समाधानकारक सुरुवात केली. मात्र त्यानंतर 2011 मध्ये त्यांच्या नेतृत्त्वात लढल्या गेलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेने जबरदस्त यश मिळवले. त्यापुढील दर विधानसभेत समाधानकारक मत घेऊन उंबरकर यांनी आपले नेतृत्त्व टिकवून ठेवले. आताही त्यांचे सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम तसेच आंदोलनं सुरु असते. मनसेच्या दाव्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ‘वणी बहुगुणी’ला प्रतिक्रिया देताना आपली भूमिका स्पष्ट केली.

मनसेचा कोणताही फायदा नाही – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही. मनसे केवळ स्टेजवर बसण्यापुरती कामात आली. गेल्या निवडणुकीत वणी विधानसभा क्षेत्रात ज्या गावात मनसेनेची लीड होती. त्या कोणत्याही गावात भाजपला लीड नाही. शिवाय मनसेच्या तालुका अध्यक्षांच्या गावातूनही कोणतीही लीड भाजपला नाही. मनसेसोबत युती करायची की नाही, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे. मात्र वणी विधानसभेसाठी वरिष्ठांनी मला कामाला लागण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मनसेचा इथे दावा करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही. 

– आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी विधानसभा

युती आघाडी करताना पक्षश्रेष्ठी पक्षाचे अस्तित्व राज्यभर टिकवण्यासाठी विविध विभागात एक तरी जागेची मागणी करतात. मनसेने सर्वाधिक जागा मुंबई, ठाणे या ठिकाणी मागितल्या आहेत. यासह खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या विभागात कुठे एक तर कुठे दोन जागा मागितल्या आहे. विदर्भात वणी या एका जागेचा समावेश आहे. मात्र वणी विधानसभा सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे. सलग दोन वेळा वणी विधानसभा क्षेत्रात भाजपने विजय मिळवला आहे. याशिवाय नगरपालिकेतही नगराध्यक्ष व प्रचंड बहुमतात भाजपचे नगर सेवक होते. त्यामुळे या जागेवर काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (पुढल्या भागात आणखी नवीन राजकीय विषयाचा आढावा.)

Comments are closed.