तरुण शेतक-याची आत्महत्या: गावात हळहळ

कुटुंबाच्या झटणा-या तरुणाने शेतातच संपवले आयुष्य

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील वांजरी येथे राहणाऱ्या महेश रामभाऊ उज्वलकर (वय 19) या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 5  नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास ही घटना उघडकीस आली, महेशने नैराश्याच्या अवस्थेत हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महेश हा वांजरी येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. बारावीनंतर त्याने शेतीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. कुटुंबाचा गाडा पुढे नेण्यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र दुपारच्या वेळेस नेमकं काय घडलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शेतात गेलेल्या महेशने झाडाला दोरखंड बांधून गळफास घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे महेश झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

या घटनेमुळे उज्वलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. महेश हा परिश्रमी, मनमिळावू आणि कुटुंबासाठी झटणारा तरुण होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक लहान भाऊ आणि एक बहीण असा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून, पोलीस तपास सुरू आहे.

Comments are closed.