शाळा संपली, मैत्री कधीच संपत नाही ! 30 वर्षांनंतर मित्र आलेत एकत्र

विवेकानंद विद्यालयाच्या 1995 च्या बॅचची निसर्गरम्य परिसरात रंगली स्नेहभेट

बहुगुणी डेस्क, वणी: बालपणाच्या आठवणींना शब्दांत पकडणं कठीण असतं. शाळेतील मैत्री, वर्गातील गमतीजमती, खेळाचे क्षण आणि अभ्यासाच्या गडबडीतले हास्याचे ठसे — हे सगळं काळाच्या ओघात मागे राहतं. पण जेव्हा हेच मित्र-मैत्रिणी तीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र येतात, तेव्हा आठवणींचा झरा वाहतो आणि मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतात. स्वामी विवेकानंद विद्यालय, वणी येथील 1995 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अलीकडेच असाच एक अविस्मरणीय स्नेहमिलन सोहळा अनुभवला. केळापूरजवळील टिपेश्वर अभयारण्याच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित या सोहळ्याने शालेय जीवनातील आठवणींना नवसंजीवनी दिली. गाणी, नृत्य, खेळ आणि हास्यविनोदांनी भरलेला हा दिवस मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला.

सुमारे ३० माजी विद्यार्थी या सोहळ्यास उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात काहींनी गाणी सादर केली, तर काहींनी नृत्याच्या ठेक्यावर सर्वांना थिरकवले. शालेय जीवनातील खेळांनी उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. “तीस वर्षांनंतर आम्ही सगळे एकत्र आलो आणि पुन्हा तीच शालेय मैत्री अनुभवली,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

या स्नेहमिलनाने केवळ आठवणींना उजाळा दिला नाही, तर मैत्रीचे बंध अधिक दृढ केले. एकमेकांच्या आयुष्यातील बदल, वाटचाल आणि अनुभव शेअर करताना प्रत्येकाच्या डोळ्यांत जुन्या दिवसांची चमक दिसत होती. हा क्षण माजी विद्यार्थ्यांसाठी केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर भावनिक पुनर्मिलन होतं.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अवि पोटे, राहुल आत्राम, रवि गजभीये, आनंद येसेकर, रवि डांगे, नईम शेख, अकील शेख, राहुल कुचणकर, सुहास खंडाळकर, स्मीता निमजे, स्नेहल एकरे, मिलिंद लोढा, रुपेश कुचेरिया, हरीश राजूरकर, राजेश केदार, वैभव जुनगरी, नितीन महाजन आदी माजी विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते.

Comments are closed.