अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात प्रभाग 9 मधील नागरिक एकवटले
दूषित पाणी, फुटणाऱ्या पाईपलाईन, अपूर्ण जोडण्यांमुळे नागरिक त्रस्त
विवेक तोटेवार, वणी: शहरातील प्रभाग क्र. 09 मध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्यांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात प्रभागातील अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची, नळांना अत्यल्प वेळ पाणी येत असल्याची तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. काही भागांमध्ये चार-चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे नमूद करण्यात आले.
याशिवाय वारंवार पाईपलाईन फुटणे, नवीन नळ जोडणी मिळण्यास होणारा विलंब, काही भागांतील अपूर्ण पाईपलाईन कामे आणि पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक नसल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ज्या भागांमध्ये अद्याप नळ सुविधा उपलब्ध नाही, तेथे पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. तसेच मंजूर झालेल्या नवीन नळ जोडण्यांचे काम तातडीने पूर्ण करून सर्व नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
नगर परिषद प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास भाग पडेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न मारोती मालेकार, नगरसेविका किरण शंकर देरकर, अब्दुल हाफिज सत्तार (टापू) यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.


Comments are closed.