वारे नगरपालिकेचे भाग 1: वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास

नगरपालिकेचा आतापर्यंतचा थोडक्यात आढावा...

जब्बार चीनी, वणी: येत्या तीन महिन्यात वणी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच शहरात निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीची विशेषता म्हणजे आगामी निवडणूक बहुसदस्य प्रभाग रचनेऐवजी एक वार्ड, एक सदस्य या रचनेद्वारा होणार आहे. वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आजपासून आम्ही नगर नगरपालिका निवडणुकीचे विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी, डावपेच आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहो. आज पहिल्या भागात आपण वणी नगर पालिकेचा व नगराध्यक्ष यांच्या बाबतचा थोडक्यात आढावा जाणून घेऊन घेऊ.

वारे नगर पालिकेचे भाग 1

नगरपालिकेचा आतापर्यंतचा थोडक्यात आढावा…
21 जून 1925 साली म्हणजे सुमारे 94 वर्षांआधी वणी नगर पालिकेची स्थापना झाली. नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान स्व. सीताराम भेदी यांना मिळाला. 1931 मध्ये विठ्ठलराव कोंडावार यांनी नगराध्यक्ष पदाची कमान सांभाळली. ऑक्टोबर 1937 मध्ये ते मार्च 1939 पर्यंत कृष्णराव पुराणिक तर एप्रिल 1939 ते नोव्हेंबर 1941 पर्यंत मोतीलाल भंडारी हे नगराध्यक्ष झाले. 1941 ते 46 पर्यंत नीळकंठराव देशपांडे हे नगराध्यक्ष होते.

स्वातंत्र्यानंतरचे पहिले नगराध्यक्ष
स्वतंत्र भारतातील पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान कृष्णराव पुराणिक यांना मिळाला. त्यांनी 1946 ते 1952 पर्यंत आपला कार्यकाळ सांभाळला. त्याच काळात बाबूराव देशपांडे या वणीतील एका धुरंधर नेत्याच्या काळाला सुरूवात झाली. 1952 मध्ये ते पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. त्यानंतर सलग 15 वर्ष म्हणजे 1967 पर्यंत ते नगराध्यक्ष पदी विराजमान होते. बाबूराव देशपांडे यांनी सर्वाधिक 25 वर्ष वणी नगर पालिकेचे नगराध्यक्ष पद भूषवले.

1967 मध्ये 9 महिन्यांच्या अल्पकाळासाठी पंजाबराव इंगोल हे नगराध्यक्ष झाले. मात्र पुन्हा बाबूराव देशपांडे हे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी 3 वर्ष नगराध्यक्ष पद भूषवले. 1971 मध्ये तीन महिन्यांसाठी विठ्ठलराव ठाकूरवार, 9 महिने उदयराज कोठारी यांनी नगराध्यक्ष पद भूषवले.

प्रभा गुंडावार झाल्या पहिल्या महिला नगराध्यक्ष
1972 मध्ये वणी नगर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर शालिनी रासेकर, साधना गोहोकर, हेमलता लामगे, आशा टोंगे, अर्चना थेरे, वर्षा लभाने, करुणा कांबळे या महिला नगराध्यक्ष वणी नगर पालिकेला लाभल्या. प्रभा गुंडावार या 28 जुलै 1972 रोजी नगराध्यक्ष झाल्या. सुमारे 2.5 वर्ष त्या या पदावर होत्या. त्यानंतर 1974 मध्ये पुन्हा बाबूराव देशपांडे यांचे पर्व सुरू झाले. ते पुन्हा 7 वर्ष नगराध्यक्षपदी राहिले. त्यानंतर 5 वर्षांचा काळ हा नगरपालिकेच्या प्रशासनाच्या हाती होता. या काळात प्रशासकीय अधिका-यांद्वारा नगरपालिकेचा कारभार चालवला गेला.

विजय मुकेवार यांचा उदय
15 मे 1985 रोजी विजय मुकेवार हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. ते वणी नगर पालिकेचे 23 वे नगराध्यक्ष होते. पुढे अनेक निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या व सत्तास्थापनेत त्यांची मोठी भूमिका असायची. 24 नोव्हेबर 1991 मध्ये पुन्हा निवडणूक झाली. ही निवडणूक विशेष गाजली होती. यावेळी शहरात 35 वार्ड होते. तर सुमारे 25 हजार मतदार होते. 35 वार्डासाठी 272 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीचा निकाल लागला. विजय मुकेवार यांच्या पॅनलचा पराभव झाला व शामराव ठाकरे हे नगरपालिकेचे 24 वे नगराध्यक्ष झाले.

मात्र शामराव ठाकरे त्यांची कारकिर्द वादग्रस्त राहिली. शहरातील व्यावसायिक मदन अण्णा पुनियाला यांच्या हत्येमध्ये त्यांचे नाव आले व त्यांना खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर पीके टोंगे यांनी 1 वर्ष नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला. ते 25 वे नगराध्यक्ष होते त्यानंतर 2 वर्ष संजय देरकर हे नगराध्यक्ष पदी होते. ते 26 वे नगराध्यक्ष होते.

शहरातील वार्डाची झाली पुनर्रचना
1996 मध्ये वार्डाची पूनर्रचना झाली व 35 वार्डाचे 23 वार्ड झाले. या निवडणुकीत 222 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत काँग्रेसचे दोन गटच आमनेसामने होते. ही निवडणूक कासावार गट व मुकेवार गट यांच्यात रंगली. या निवडणुकीत कासावार गटाचे सतीशबाबू तोटावार यांना पराभूत करत अरुण पटेल हे 27 वे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर सतीशबाबू तोटावर, सुरेश रायपुरे, शालिनी रासेकर, आशा टोंगे हे नगराध्यक्ष झाले.

2001 मध्ये पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून नगराध्यक्षाची निवड
2001 ची निवडणुकीमध्ये पहिल्याचा प्रभाग रचना आली. शहरातील 25 वार्डाचे 8 प्रभाग करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून नगराध्यक्ष पदासाठी लढत झाली. यावेळी नगराध्यक्ष पद हे महिला राखीव होते. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शालिनी रासेकर यांनी दणदणीत व एकतर्फी विजय मिळवला. त्यांनी नीलिमा काळे यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेस रिपाई युतीचे 13 उमेदवार निवडून आले. यात काँग्रेसचे 10 तर रिपाई (कवाडे) गटाचे 3 नगरसेवक होते. सेनेला 4 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या तर भाकप माकपला प्रत्येकी 1 जागा मिळाल्या. या निवडणुकीत काँग्रेसने जरी दणदणीत यश मिळवले असले तरी नगराध्यक्ष पदाची माळ मात्र अपक्ष उमेदवार म्हणून थेट जनतेमधून निवडून आलेल्या शालिनी रासेकर यांच्या गळ्यात पडली. 2005 मध्ये शालिनी रासेकर यांच्यावर अविश्वास ठराव पारीत करण्यात आला. 20 विरुद्ध 5 मतांनी हा ठराव पारीत झाला व त्यांना पायउतार व्हावे लागले.

2005 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता
नगराध्यक्षावर अविश्वास ठराव आल्यामुळे पोटनिवडणूक झाली. एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी जून 2005 साली झालेल्या या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या साधना गोहोकर यांनी काँग्रेसच्या निर्मला प्रेमलवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीची सत्ता आली. हा कार्यकाळ जरी एकच वर्षांचा असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस या काळात शहरात बळकट झाली व पुढील निवडणुकीत त्यांना याचा चांगलाच फायदा झाला.

2006 साली निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने यात दणदणीत यश मिळवले. अपक्षांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. डॉ. हेमलता लामगे या नगराध्यक्ष झाल्या. त्यांनी अडीज वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर 2008 मध्ये यादव सातपुते हे नगराध्यक्ष झाले. यादव सातपुते यांचा कार्यकाळ चांगलाच गाजला. यावेळी उपनगराध्यक्ष म्हणून राकेश खुराणा होते. कृष्ण-पेंद्याची जोडी म्हणून ही जोडगोळी प्रसिद्ध होती. यादव सातपुते यांच्या पश्चात राकेश खुराणाच सर्व कारभार पाहतात असा आरोप यावेळी व्हायचा. त्यानंतर काही काळासाठी यादव सातपुते हे सुट्टीवर गेले व नगराध्यक्ष पदाचा प्रभार राकेश खुराणा यांच्याकडे आला.

2011 मनसेची हव्वा… संपूर्ण राज्यात चर्चा
2011 साली अचानक मनसेने नगरपालिका निवडणुकीत मुसंडी मारली. यावेळी 25 पैकी 8 नगरसेवक मनसेचे निवडणूक आले. तर राष्ट्रवादी 4, सेना 3, काँग्रेस 2 व भाजपला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावे लागले होते. मनसेच्या या कामगिरीची राज्यभर चर्चा झाली. मात्र राजकीय डावपेचात नवखी असलेली मनसे अनुभवी धुरंधरापुढे टिकू शकली नाही व सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असतानाही मनसे सत्तेबाहेर बसली. तर दुसरीकडे सर्व पक्ष एकत्र येत त्यांनी आघाडी केली व सेनेच्या अर्चना थेरे या नगरपालिकेच्या 27 व्या नगराध्यक्ष झाल्या. 2.5 वर्षांनंतर नगराध्यक्ष पद हे एससी महिला राखीव असे आरक्षीत झाले. त्यानंतर अखेर मनसेला नगराध्यक्ष पदाचा मान मिळाला. 31 जुलै 2014 ला मनसेच्या वर्षा लभाने या नगराध्यक्ष झाल्या. 1 वर्षांनंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव आला. मनसेचे काही नगरसेवक फुटले व त्यांनी लभाने विरोधात मतदान केले. त्यानंतर करुणा कांबळे या नगराध्यक्ष झाल्या. ऑक्टोबर 2015 ते डिसेंबर 16 पर्यंत म्हणजे निवडणूक होई पर्यंत त्या नगराध्यक्ष पदी होत्या.

नगरपालिकेत मोदी लहर
2016 ची निवडणूक विशेष गाजली ती भाजपच्या लहर मुळे. भाजपने या निवडणुकीत सर्व पक्षांचा सुपडा साफ केला. 25 पैकी 21 जागी भाजपचे नगरसेवक निवडून आले. इतर पक्षांना एकही जागा मिळाली नाही. 4 जागा अपक्षांना मिळाल्या. तर नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत तारेंद्र बोर्डे यांनी दणदणीत पराभव करत विजय मिळवला व ते 38 वे नगराध्यक्ष झाले. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री शहरात आले होते. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचा व मोदी लाटेचा लोकांवर चांगला प्रभाव पडला होता. भाजपचा हा विजय सर्वांनाच अनपेक्षीत होता. किमान एकही जागा निवडून न येणे यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. निकालाच्या दिवशीच संध्याकाळी सर्वपक्षीय विरोधी नेते यांनी ईव्हीएमचा घोळ असा आरोप करत या निकालाचा विरोध केला होता. त्यानंतर संजय देरकर यांनी निवडणुकीत पक्षाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी 4.5 पेक्षा अधिक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला व ते संपूर्ण टर्म पूर्ण करणार आहे.  
क्रमश:
(नगरपालिका निवडणुकीचे विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी आणि डावपेच पुढील भागात. त्यामुळे वारे नगर पालिकेचे ही सिरीज वाचण्यास विसरू नका…)

वणी बहुगुणीच्या सर्व अपडेट साठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज तसेच गृप जॉईन करा…

पेज लिंक – https://www.facebook.com/wanibahuguni/

गृप लिंक – https://www.facebook.com/groups/241871233000964/

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.