लालपुलिया परिसरात पिण्याच्या पाण्याच्या बिलावरून राडा

ड्रायव्हर आणि त्याच्या परिवाराला लाकडी काठीने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या उन्हाळा लागला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. मात्र हा कुणाला जखमी करेपर्यंत जाईल, याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. अशीच घटना लालपुलिया परिसरात घडली. नरेश बिसव्वा शाहू (45) आपल्या परिवारासह लालपुलिया भागात राहतात. ते व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. ते नरेश दासभाई यांच्याकडे कोळशाची गाडी चालवतात. त्यांच्या घरासमोर गोलू बंजारे (35) त्याच्या बहिणीसोबत राहतो.

गोलू बंजारे हा नरेश शाहू यांच्या मोटर बोरवेलचे पाणी वापरतो. त्याचं ते महिन्याला बिल देतात. मात्र रविवार दिनांक 23 मार्चच्या रात्री 9.30 च्या सुमारास गोलू बंजारे याचा भाचा सोनू बंजारे शाहू यांच्याकडे पाणी भरायला आला. त्यावर नरेश शाहू म्हणाले की, आधीचे चार महिन्यांचे पाण्याचे बिल दे, नंतर पाणी घेऊन जा. त्यावर तो म्हणाला की, आम्ही देणार नाही. तेवढ्यात गोलू बंजारे तिथे आला. आणि म्हणाला की, तू माझ्या भाच्याकडून कशाला पैसे मागत आहेस? असे म्हणत बाजूला असलेली काठी उचलली. ती फिर्यादी नरेश शाहू यांच्या डोक्यावर मारली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तेव्हा नरेश यांचा छोटा भाऊ सुरेश आणि त्यांचा मुलगा जय तिथे पोहोचले. तेव्हा गोलू बंजारेने त्यांच्याही डोक्यावर काठी मारली आणि जखमी केले. मग काही वेळ गेल्यानंतर गोलूच्या दोन बहिणी तिथे आल्यात. त्यांनीदेखील नरेश आणि त्यांच्या भावाच्या डोक्यावर मारून जखमी केले. शिवीगाळ केली. त्यानंतर शाहू थेट ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गोलू बंजारे (35) व त्याच्या बहिणींनी पिण्याच्या पाण्याचे बिल मागितल्यावरून काठीने मारहाण केल्याची तक्रार नरेश शाहू यांनी वणी पोलीस स्टेशनला केली. आरोपींवर कलम 118 (1), 3(5), 352 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Comments are closed.