अबब…! बोअरवेलला लागली कळं, पाणी ‘बदंबदं’ गळं

बंद बोअरमधून पाणी ओवरफ्लो, शेती बनत आहे निसरडी

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात सध्या एक घटना सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका बंद असलेल्या बोअरमधून पाणी चक्क ओवरफ्लो होऊन सतत वाहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चनोडा येथील ही घटना असून निसर्गाचा हा चमत्कार बघण्यासाठी परिसरातील अनेक लोक सध्या या ठिकाणाला भेट देत आहे. मात्र ओव्हफ्लोमुळे शेतमालकाचे मात्र चांगलेच नुकसान होत आहे.

तालुक्यातील वर्धा नदीकाठावरील चनोडा हे एक छोटसं गाव आहे. या गावामध्ये एक अल्पभूधारक शेतकरी मुरलीधर लक्ष्मण अहिरकर (45) हे राहतात. शेती करणे तसेच घरी छोटीसी पण टपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे हा नित्यक्रम. मुरलीधर यांचेकडे 3 एकर शेती आहेत. या शेतीमध्ये 2010 मध्ये 200 फूट बोअर मारलेला आहेत. यावर्षी यांनी आपल्या शेतामध्ये कपाशी व तूर या दोन पिकांची पेरणी केलेली आहे.

यावर्षी सतत पाऊस पडत आहेत. या सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहेत. त्यामुळे शेतामध्ये असलेल्या बोअरमधून पाणी वर फेकत आहेत. हा निसर्गाचा चमत्कार आहे की पुन्हा काही वेगळे असे अनेक मतप्रवाह आहेत. 2012 मध्येही अशाच प्रकारे यांच्या शेतीमधील बोअरमधून पाणी वर फेकले होते. पण यावर्षी हा पाणी वर फेकण्याचा हा कालावधी लांबलेला दिसत आहे.

बोअरमधून सतत पाणी वाहत असल्यामुळे शेतामध्ये सगळीकडे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शेतामध्ये चालणेही कठीण झाले असून सगळीकडे पाणी साचून असल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कपाशी पिवळी पडलेली असून तुरीसुद्धा मरत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्याने याविषयी कृषिविभागाला कळविले असून कृषी विभागाचे डी. ए. गाडगे यांनी या शेताला भेट दिलेली आहे. सदर शेतामध्ये पाणी साचून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक मदत मिळावी या अपेक्षेत आहे.

Comments are closed.