वणीत पाणी पेटलं, महिला झाल्या आक्रमक
वणी(रवि ढुमणे): गेल्या कित्येक वर्षांपासून वणी शहरातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र यावर उपाय करण्यासाठी लोकप्रतिनिधी सह पालिका प्रशासन हतबल झाले आहे. सध्या गावातील ट्युबवेल मधील पाणी टँकरमध्ये भरून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री भीमनगर व वासेकर लेआऊट मधील नागरिकांनी ट्युबवेल मधून पाणी भरून घेऊन जाणारा टँकर अडवून पालिकेविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. मात्र वणीतील लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून जणू गप्पच बसले असल्याचे चित्र दिसत आहे.
एकीकडे टाकीत पाणी नाही. ट्युबवेलची पातळी कमी झाली आहे. त्यातच पालिकेने शहरातील विविध ठिकाणी असलेल्या ट्युबवेल मधील पाणी टँकरद्वारे भरून शहरात पाणी वाटप सुरु केले आहे. पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला पाणी मिळणार नाही असे लक्षात येताच शहरातील भीमनगर व वासेकर लेआऊट भागातील महिला एकवटल्या स्थानिक नागरिकांना घेऊन त्यांनी ट्युबवेल मधून पाणी घेऊन जाणारा टँकर अडवून पालिका प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला आहे. शहरातील सर्वच भागात पाणी पेटले आहे. इतकी ज्वलंत समस्या असताना येथील पुढारी गप्प बसून आहे. हेच वणीकरांचे खरे दुर्भाग्य आहे.
वणी शहराला पाणी पुरवठा करणारी जीवनदायिनी निर्गुडा कोरडी ठाक पडली आहे. तर नवरगाव धरणातील आरक्षित असलेले पाणी अखेरच्या घटका मोजत आहे. शहराला आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत आहे. पाणी नसल्याने कित्येक लोक गावाकडे परत जाण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जानेवारी महिन्यात वर्धा नदीचे पाणी शहरात दाखल करून वणीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविणार असे पोकळ आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात आणि वणीतही त्यांचीच सत्ता असताना जनतेला खोटे आश्वासन देत वेळच मारून नेला आहे. केंद्रीय मंत्री दर आठवड्यात वणीत दाखल होतात. तर आमदार उदघाटन सोहळ्यात मग्न आणि पालिकेतील पदाधिकारी सत्तेत मश्गुल आहे. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी कोणीही युद्धपातळीवर प्रयत्न केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगर पालिकेत मागील काळात मिशन निर्मल निर्गुडा अभियान राबवण्यात आले. त्यासाठी वर्गणी गोळा करून लाखो रुपये खर्च केले गेले. पण इतके करून देखील नदीत पाणी साठलेच नाही. जनतेच्या भावनांशी खेळ करायचा आणि स्वतः प्रसिद्धी मिळवायची इतकेच उरले आहे. शहरात पाणी प्रश्न पेटला असताना लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते गप्प का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाण्याचे नियोजन कसे करायचे हे त्यांना चिखलगाव कडून शिकण्याची गरज आहे. भविष्यात जमिनीतील पाण्याची पातळी टिकून राहण्यासाठी चिखलगाव ग्रामपंचायतीने आधीपासूनच नियोजन केले आहे. म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून चिखलगावचे माजी सरपंच सुनील कातकडे हे स्वखर्चाने वणी शहरात टँकरने पाणी पुरवठा करीत आहेत. तर दुसरीकडे वणीतील पुढारी सत्तेत मश्गुल झाले आहे. भविष्यात वणीत तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. तेव्हा युद्धपातळीवर उपाययोजना करून वणीकरांची तहान भागवणे गरजेचे आहे. भीमनगर आणि वासेकर ले आऊट मधील महिलांनी त्यांच्या परिसरातील ट्युबवेलमधले पाणी घेऊन जाण्यास मज्जाव केला आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन इतर परिसरातील महिलांनी जर हिच भूमिका घेतली तर पाणीप्रश्न आणखी पेटणार हे दिसून येत आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा काय म्हणतात संतप्त महिला…