उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी प्रश्न पेटला, संतप्त महिलांची कार्यालयावर धडक
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या काही दिवसांपासून वणी नगरपालिकेतर्फे घाण, दुर्गंधीयुक्त व अनियमीत पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गुरूनगर, प्रगतीनगर, भोंगळे ले आऊट, इंदिरा चौक व जैन लेआऊट परिसरातील महिला वणी पालिका व तहसील कार्यालयावर धडकल्या. दरम्यान माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी देखील आक्रमक भूमिका घेत पालिका प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम देत 14 मार्च पर्यंत शुद्ध व नियमित पाणी पुरवठा न झाल्यास मुख्याधिकारी यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा दिला.
गेल्या तीन महिन्यांपासन वणीतील विविध भागांमध्ये अशुद्ध व अनियमित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी अनेकदा मुख्याधिकारी, आमदार यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. मात्र मुख्याधिकारी यांनी समस्या सोडवण्यास कोणतेही पाऊल उचलले नाही, तर दुसरीकडे आमदारांनी महिलांची भेट घेतली. मात्र त्यांच्यासमोर कंत्राटदाराने वेळ मारून नेली व यावर कोणतीही उपाययोजना केली नाही असा आरोप महिलांनी केला आहे.
वणी शहरात उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण होते. ही समस्या लक्षात घेऊन वर्धा नदीवर रांगणा भुरकी येथून पाईपलाईन टाकून वणीकरांना पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. मात्र काही महिन्यांआधी या नळयोजनेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा संपूर्ण भार निर्गुडा नदीवर आला. परिणामी शहरातील अनेक भागात अनियमीत पाणी पुरवठा सुरू झाला आहे. पावसाळा व हिवाळ्यात नागरिकांना पाण्याची समस्या जाणवली नाही. मात्र आता उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांना अनियमीत पाणी पुरवठाचा फटका बसू लागला. त्यातच येणारे पाणी हे अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. गुरुवारी दिनांक 9 मार्च रोजी राजू तुराणकर यांच्या नेतृत्त्वात संतप्त महिला पालिका व तहसील कार्यालयावर धडकल्या.
तारेंद्र बोर्डे यांचा अल्टिमेटम
लोकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत शुक्रवारी दिनांक 10 मार्च रोजी मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांची भेट घेतली. त्यांनी या समस्येवर मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून सात महिन्यांपासून रांगणा भुरकी नळयोजनेत बिघाड झाला असताना याची दुरुस्ती का केली नाही? असा सवाल उपस्थित केला. सोबतच त्यांनी 14 मार्चपर्यंत ही समस्या सोडवली नाही; तर अधिका-यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा देखील दिला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक नीलेश होले, नितीन चहाणकर, निखिल खाडे यांच्यासह शहरातील विविध भागातील नागरिक उपस्थित होते.
वणीकरांच्या आरोग्याशी खेळ – राजू तुराणकर
निर्गुडा नदी व वर्धा नदीवर स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. याशिवाय संपूर्ण शहरात 22 जीवंत बोअरवेल आहे. वणीकर जनतेला तीन दिवसाआड पाणी पुरवठा म्हणजे वर्षातून केवळ चार महिने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र टॅक्स हा वार्षिक वसूल केला जात आहे. पाण्याच्या टाक्या दरमहा साफ केल्या जात नाही. कोणत्याही पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षक नाही. ही बाब वणीकर जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून मी संबंधीत कंत्राटदाराची भेट घेत आहे; मात्र कोणताही फायदा झाला नाही. या समस्येवर तात्काळ योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे.
– राजू तुराणकर, माजी नगरसेवक
नियमीत व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत महिलांनी पालिकेचे प्रशासक असलेले तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळी राजू तुराणकर, मंगल भोंगळे, सुदाम गावंडे, महेश पाहपळे, शुभांगी सपाट, ललिता वाडस्कर, ज्योती कापसे, गीता तुराणकर, कुंदा नांदे, साधना तुराणकर, जोस्त्ना सुरपाम, तुळसा नगराळे, विद्या वानखेडे, सीमा खोब्रागडे, सविता ताजने, संजीवनी मोहितकर, सुरेखा डोंगे, सुरेखा बोधे, ज्योती नगराळे, सुनीता संजय चार्लेकर, सुरेखा झाडे, बल्की, पेटकर, सविता ठाकरे, ज्योती तुराणकर, पूजा ढाले, रजनी ताजने, माला प्रभाकर, कमळ झाडे, सुरेखा चिट्टलवार, संगीता हेपट, मीनाक्षी मजगवळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Comments are closed.