21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

विवेक तोटेवार, वणी: एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजूर (इजारा) येथे घडली. स्नेहा सुभाष पंडलवार असे मृत तरुणीचे नाव असून गुरुवारी दुपारी घरी कुणी नसल्याची संधी साधून तिने हे पाऊल उचलले. या घटनेची वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

मृत स्नेहा सुभाष पंडलवार ही राजूर येथे आपली आई, भाऊ, आजी, आजोबा यांच्यासोबत राहायची. तिचे आजी आजोबा हे शेतात काम करतात तर आई एका रेस्टॉरन्टमध्ये काम करते. त्यामुळे ती तीन दिवसातून एकदा घरी येते. तर वडील सुभाष पंडलवार हे अकोला खुर्द येथे राहतात. शिक्षण पूर्ण झाल्याने स्नेहा ही घरीच असायची.

गुरुवारी 9 मार्च रोजी नेहमीप्रमाणे स्नेहाचे आजी आजोबा हे शेतात कामासाठी गेले होते. तर लहान भाऊ रोहन हा कामानिमित्त वणी येथे गेला होता. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास रोहन जेव्हा घरी आला तेव्हा घराच्या दरवाजाची कडी आतून लावलेली होती. रोहनने नेहमीप्रमाणे हात टाकून आतील कडी उघडली असता घराच्या लाकडी फाट्याला त्याची बहीण स्नेहा हिने आपल्या ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले.

रोहनने हा बाब तात्काळ शेजारी व नातेवाईकांना सांगितले. स्नेहाला तात्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी प्रश्न पेटला, संतप्त महिलांची कार्यालयावर धडक

Comments are closed.