पाणी प्रश्नावर एकमेकांवर चालढकल, संजय खाडे यांचा आरोप

पाणी समस्या सोडवण्यास नगर पालिकेला 7 दिवसाचा अल्टिमेटम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्न सोडवण्याऐवजी प्रशासन एकमेकांवर चालढकल करून वेळ मारून नेत आहे, असा आरोप संजय खाडे यांनी केला आहे. संजय खाडे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नगरपालिका गाठली व मुख्याधिकारी यांच्याशी पाणी प्रश्नावर चर्चा केली. एका आठवड्यात शहरातील पाणी समस्या सुटली नाही तर नगरपालिकेसमोर मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील यावेळी दिला गेला.

Podar School 2025

निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून वणीत अपुरा पाणी पुरवठा होत आहे. आधी उन्हाळा नसल्याने याचा सर्वसामान्यांना जास्त फटका बसत नव्हता. मात्र आता भर उन्हाळ्यात गेल्या महिन्यांपासून एक एक आठवडा नळ येत नाही. तर काही भागात गेल्या 15 दिवसांपासून नळ आलेले नाही. यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पाणी येत नसल्याने अनेक लोकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटकाही वणीकरांना बसत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एकमेकांवर चालढकल – संजय खाडे
सध्या पालिकेद्वारे लाईट नसल्याने पाणी येत नसल्याचे उत्तर देत वेळ मारून नेली जात आहे. पालिका महावितरणला वादळाला जबाबदार धरत आहे. कुणी कंत्राटदाराला जबाबदार धरत आहे. अनेकदा मध्यरात्री नळ सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण रात्र नळाची वाट पाहत काढावी लागते. अनेकदा संपूर्ण रात्र जागूनही नळ येत नाही. यामुळे वणीकर चांगलेच हैराण झाले आहेत.
– संजय खाडे, काँग्रेस

येत्या एक आठवड्यात वणीकरांची पाणी समस्या सोडवावी. अन्यथा वणीकरांना सोबत घेऊन नगर पालिकेसमोर मोठे आंदोलन केले जाईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी राजाभाऊ पाथ्रडकर, साधना गोहोकर, शारदा ठाकरे, अशोक चिकटे, प्रेमनाथ नैताम, पीएस उपरे, प्रमोद लोणारे, पलाश बोढे, क्रिष्णा पचारे, सुरेश बनसोड, लता भोंडाळे, मिनाक्षी रासेकर, पद्मा ताजणे, सारिका बोबडे, संगिता खाडे, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, ललिता बरशेट्टीवार, मंगला झिलपे, सविता रासेकर, अशोक पांडे, कैलास पचारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Comments are closed.