पाणी थेंब थेंब गळं…

गळत्या टँकरने वणीत पाणीपुरवठा...

0

गिरीश कुबडे, वणीः वणीकरांचा जीव पाण्यासाठी कासावीस होत आहे. पाणी किती महत्त्वाचे आहे, हे आता कुणालाच सांगायची गरज नाही. पाण्याची उधळपट्टी होऊ नये म्हणून हल्ली सगळेच काळजी घ्यायला लागले आहेत. एकेक पाण्याचा थेंब वणीकर काटकसरीने वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण याच पुरवठा करणाऱ्या टँकरमधूनच पाणी गळायला लागला की वणीकरांचा जीव तीळ तीळ तुटतो. गळणाऱ्या फुटक्या टँकरच्या भोवताली भांडी लावून वणीकर हा अपव्यय टाळत आहेत.

वणीकरांची तहान भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर आला की सगळ्यांची धावपळ सुरू होते. घरातल्या अगदी लहानातल्या लहान भांड्यांत पाणी साठवून ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. टँकर ज्या ठिकाणाहून निघतो तिथपासून तर जिथे पाणीवाटप करायचे आहे तिथपर्यंत पाणी गळते. एकेक थेंब महत्त्वाचा असताना पाणी नाहक वाया जात आहे.

पाण्याच्या रोजच्या आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी टँकरवरच अवलबंून राहावं लागते. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे किंवा अन्य कारणांनी अनेकांकडे पाहुण्यांचीदेखील गर्दी लागली आहे. आतापर्यंत लग्नांचा हंगाम होता. त्यामुळेदेखील पाण्याचा वापर घरातही वाढला होता. मात्र पुरवठा करणाऱ्या टँकर्समधून पाण्याची होत असलेली गळती ही वणीकरांच्या पचनी न पडणारी आहे. टिव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रांतून पाण्याची बचत करायला सांगणारे मात्र अशा गळत्या टँकरसाठी काहीच करायला तयार नाहीत. गळ्यातलंही पाणी आटलं, डोळ्यांतलही पाणी आटलं; मात्र टँकरमधील पाणी अजूनही गळतच आहे. यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी वणीकरांची मागणी आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.