पाण्यासाठी जागताहेत यवतमाळकर, तिन्ही पिढ्या लागल्या रांगेत

0

गिरीश कुबडे, यवतमाळः शहरवासीयांच्या तोंडचेच पाणी सध्या पळाले आहे. वाढता उन्हाळा. कासावीस जीवाची तहान भागविण्यासाठी आता रात्रीचे जागरणदेखील सुरू झालेत. कधी कोणती सामाजिक संस्था, राजकीय पक्ष किंवा प्रशासनाचा टँकर येईल याचाही नेम नाही. परिसरात कधीही टँकर येईल म्हणून सगळेच रात्रभर जागरण करीत असल्याचे चित्र यवतमाळ शहरात दिसत आहे.

अनेक आंदोलने झालीत. निवेदन आणि मागण्यांचा कोरड्या आश्वासनांनी पाठपुरावा होत आहे. यवतमाळ शहरातील पाणीटंचाई ही दरवर्षीची समस्या आहे. परिसरातील धरणेदेखील आता कोरडी झालीत. शहराला आधार असलेला बंेबळा प्रकल्पही आता निराश करीत आहे. लहान लेकरं, वृद्ध अशा तिन्ही पिढ्या रात्रभर कधीही पाणी मिळेल या आशेने रात्रभर जागत रांगेत उभे असतात. पाणी हा जीवनावश्यक घटक आहे. त्याच्याशिवाय यवतमाळकरांची ससेहोलपट होत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पूर्वी खेळणारी, बागडणारी ही लेकरं आता रात्ररात्रभर जागत असतात. आता लेकरंदेखील त्यांचं बालपण हरवून मोठ्यांसारखेच पाण्याच्या प्रतीक्षेत असतात. ज्येष्ठ नागरिकांनादेखील रांगेत एक भांड वाढतं म्हणूनच मजबुरीने उभं राहावं लागत आहे.पाहुण्यांची पूर्वी असणारी वर्दळदेखील बंदच झाली. खूपच महत्त्वाच्या कामाशिवाय घरात पाहुणादेखील थांबविणे अवघड झाले. आजारी, तान्ही लेकरं यांची तर अवस्था अत्यंत बिकटच आहे. टँकर आणि तत्सम बाबींनी ही तहान भागविण्याचा प्रयत्न होत आहे. आता यवतमाळकरच नव्हे तर त्यांच्या आशा, अपेक्षा आणि तहानीदेखील सध्या रांगेत लागल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.