धक्कादायक… ! उंदिर मरून पडलेल्या पाईपद्वारा नागरिकांना पाण्याचा पुरवठा
नागरिकांना कोणी वाली आहे की नाही ? नागरिक संतप्त...
सुशील ओझा, झरी: उंदिर मरून पडलेल्या पाईपद्वारा नागरिकांना पाणीपुरवठा केल्याचा धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार बोपापूर येथे उघडकीस आला आहे. सोमवारी 16 नोव्हेंबरला ही घटना समोर आली. याबाबत ग्रामपंचायतीबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीद्वारा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याने त्यांना कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न गावकरी विचारीत आहे.
बोपापूर गावात पाणीपुरवठ्यासाठी गावातीलच पाण्याच्या टाकीतून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सुमारे 800 ते 900 नागरिकांना या टाकीद्वारे पाणीपुरवठा होतो. दोन दिवसांआधी गावातील पाणी पुरवठा बंद झाला होता. नळाने पाणी पुरवठा होत नसल्यामुळे पाईपची पाहणी केली असता पाईपमध्ये उंदीर फसून असल्याचे आढळून आले. त्यानंतर मृत अवस्थेतील उंदीर बाहेर काढण्यात आला.
उंदरांची समस्या नेहमीच – अमोल आवारी
पाणीपुरवठा करणा-या टाकीच्या पाईपमध्ये उंदिर मरून आढळल्याची ही पहिली घटना नाही. याआधीही असाच प्रकार समोर आला होता. ग्रामपंचायतीचे नागरिकांच्या आरोग्याकडे थोडे ही लक्ष नाही. पाण्याच्या टाकीत पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर टाकण्यास गावकऱ्यांनी अनेकदा सांगितले. परंतु ग्रामपंचायत सचिव, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी याबाबत चालढकल केली.
– अमोल आवारी, समाजसेवक बोपापूर
बोपापूर ग्रामपंचायतीचा कारभार वा-यावर
सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या भरवश्यावर सुरू आहे. मात्र ग्रामपंचायतीमध्ये सचिव तसेच प्रशासक फिरकूनही पाहत नाही. असा आरोप गावकरी करीत आहे. याशिवाय ग्रामपंचायत कर्मचा-यांचे सुद्धा ग्रामपंचायतीकडे लक्ष नाही. पाणी पुरवठा करणा-या पाईपमध्ये उंदीर मरून पडलेली घटना समोर आल्याने ग्रामपंचायतीचा नागरिकांच्या आरोग्याशी काही घेणे देणे आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहे.
हे पण वाचा…
प्रवीण खानझोडे: मजुरी ते व्यावसायिक… एका कार्यकर्त्याचा थक्क करणारा प्रवास…