अखेर वेकोलिने ‘ते’ टिप्पर व ड्रायव्हरला केले ब्लॅक लिस्ट

कोळशा ऐवजी दगड गोटे टाकणे भोवले, दुप्पट रकमेची वसुली

0

जब्बार चीनी, वणी: उच्च प्रतिच्या कोळशाच्या ऐवजी माती दगडाचे मिश्रण रेल्वे सायडींगवर खाली करताना सुरक्षा गार्डांनी पकडलेल्या टिप्परवर अखेर 25 दिवसानंतर कारवाई करण्यात आली. सदर टिप्पर व त्याच्या ड्रायव्हरला वेकोलि वणी नार्थ मधून ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. कंत्राटदार युनाईटेड कोल कॅरीअर कंपनी कडून 28 टन कोळशाच्या दुप्पट किंमत बिलातून कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या ट्रकवर कारवाई होऊ नये म्हणून वणीतील एका स्वयंघोषीत कामगार नेत्याने चांगलाच आटापिटा केला होता. मात्र यावेळी त्याची डाळ दगड गोटे मिश्रीत कोळशावर काही शिजली ऩाही.

22 मार्च 2020 रोजी वेकोलि वणी नार्थ क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या दोन सुरक्षा गार्डना माहिती मिळाली की रात्री 2.14 वाजता युनाईटेड कोल कॅरिअर कंपनीत चालत असलेला टिप्पर (एम च.34 एव्ही3096) गेट पास नं. 278 रेल्वे सायडींग वर खाली न होता परस्पर बाहेर गेला आहे. दोनही गार्ड ताबडतोब सायडींगवर पोहोचले असता त्यांना सदर टिप्पर आढळला नाही. अर्ध्या तासानंतर तो टिप्पर सायडींगच्या काट्यावर आला असता गार्डनी तो टिप्पर वेगळा खाली करायला लावला.

सदर टिप्पर कोलारपिंपरी वरून 28.470 टन कोळसा घेउन निघाला होता. परंतु टिप्पर खाली झाल्यावर तिथे कोळशा ऐवजी माती दगडाचे मिश्रण दिसुन आले. दुस-या दिवशी सकाळी सायडींग इंजार्ज निशाद ने रात्री घडलेली घटना कोलारपिंपरीचे उपक्षेत्रीय प्रबंधक प्रसाद यांना सांगितली. त्यांनी ताबडतोब नोडल अधिकारी राहुल बन्सोड यांना रेल्वे सायडींगवर पाठवीले. बन्सोड यांनी त्या कोळसाचा पंचनामा करून आपला अहवाल दिला ज्यात स्पष्ट लिहीले की सदर कोळसा हा कोलारपिंपरी खाणीचा नाही.

जीपी आर एस विभागानं सु्द्धा आपला अहवाल दिला की रात्री 2.44 ते 3.51 वाजेपर्यत त्या टिप्पर चा जीपीआरएस बंद होता. टोल नाक्यावरून जी माहिती आली त्यातही गाडीचे टायमिंग जुळत नव्हते. एवढं सर्व स्पष्ट असताना ही रेल्वे सायडींग इंचार्जने ताबडतोब पोलीस स्टेशनला एफआयआर करून सदर गाडी ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव वरीष्ठांकडे सादर करणे भाग होते. मात्र तसे काही न करता ताब्यात असलेली गाडी सुद्धा सोडुन देण्याची महेरबानी केली.

मुख्य महाप्रबंधक आर के सिंग यांना जेव्हा प्रकरण माहित पडले तेव्हा त्यांनी संबंधीत अधिका-यांना चांगलेच फटकारले व दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले. अखेर याप्रकरणी टिप्पर व टिप्पर ड्रायव्हर शंकर रामदास वनकर यांच्यावर कारवाई करत त्यांना वणी नॉर्थ क्षेत्रातून ब्लॅकलिस्ट केले. वणी वेकोलि नॉर्थ क्षेत्रातून लांब अवधी साठी हायवा ट्रक ब्लॅक लिस्ट होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

स्वयंघोषीत कामगार नेत्याचा काळा कारनामा…

सदर हाईवा या पूर्वीही दोनदा असाच सापडला होता. पण वेकोलिच्या एका कामगार संघटनेच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या स्वयंघोषीत नेत्याच्या दबावाने हे प्रकरण रफादफा करण्यात आले होते. यावेळी सुद्धा या काडी बहाद्दर नेत्याने ही गाडी ब्लॅक लिस्ट न होण्याकरीता मोठा आटापीटा केला. परंतु त्याला यश आले नाही व अखेर वेकोलि प्रशासनाने कठोर कारवाई केली. या स्वयंघोषीत नेत्याला या प्रकरणात काय स्वारस्य आहे याविषयी खमंग चर्चा रंगत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.