ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारा विरुद्ध ग्रामस्थांचे उपोषण

वेडद ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, लोकप्रतिनीधी व अधिकारी उदासीन

0

रफीक कनोजे, मुकूटबन: ग्रामपंचायतीला ग्राम पातळीवरील ग्राम संसद म्हटलं जाते. जिची स्थापना ही ग्राम विकासासाठी करण्यात आली, परंतु मौजा वेडद येथील ग्रामपंचायत अजूनही विकासाच्या कोसो दूर आहे त्यामुळे वेडदच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. गुरुवारपासून इथले रहिवासी झरी पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी शिबला येथील एका कार्यक्रमात लोकप्रतिनिधींनी भेट दिली. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या उपोषण मंडपाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

सन-२०१४,२०१५,२०१६ पासून तेथील ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी ग्राम विकासाचा निधी स्वःविकासासाठी वापर करून चक्क शासनाची व ग्रामवासीयांची दिशाभूल केल्याचा आरोप तेथील ग्रामस्थ करीत आहे. यापूर्वी अनेकदा शासनाकडे याबाबत चौकशी व्हावी यासाठी तक्रार देण्यात आली पण कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, अखेर गुरुवारी नाईलाजाने तेथील ग्रामस्थांनी उपोषणाचं पाऊल उचललं.

वेडद येथे विकास कामाचा निधी तर आला, पण तो निधी कुठल्याही विकास कामाला न वापरता विकास खर्च केल्याचा अहवाल शासनाला देऊन ग्रामस्थांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले, आणि काही प्रमाणात जो निधी विकास कामाला वापरला गेला ते विकास काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले. मग ते स्मशानभूमी असो, सांडपाणी विल्हेवाट असो अशा अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वेडद येथील भीमराव रामजी सोयम (मा. सैनिक), हरिभाऊ मारोती सुरपम, राजू छगन टोंगे, संजय तानबाजी बोरकर, रमेश तुकाराम चंंदनखेडे, संतोष विठ्ठल जगताप, संदीप किसन मेश्राम, प्रदीप लटारी निखाडे, पांडुरंग जंबू काटवले, सतीश हरिदास गाताडे, मंगल हनुमंत मडावी इत्यादी ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. यापुढे ते यवतमाळ येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.

उपोषण मंडपाला गुरुवारी  तहसीलदार राऊत, बीडीओ गवइ, थानेदार शिवाजी लष्करे , सेना उप प्रमुख संतोष माहुरे, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकाश मॅकलवार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली.

वेडद येथीलच एक नागरिक भीमराव रामजी सोयाम (माजी सैनिक) हे यावेळी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना म्हणाले की…

ज्यावेळेला आई-वडिलांची सेवा करायला हवी. पत्नी, मुले यांना वेळ द्यायला हवा अशा वेळी आपले कुटुंब एकटे टाकून देश रक्षणासाठी सीमेवर राहून आपली जबाबदारी पार पडली, पण अाज सैनिक सेवेतून निवृत्त होऊनसुद्धा वाटेला संघर्षच दिसून येत आहे. एकीकडे मीडिया वर आपल्याला देशप्रेम, देशभक्ती चे गुणगान करतांना दिसून येते पण या वयात हक्कासाठी संघर्ष करावा लागत असेल तर यापेक्षा आपल्यासाठी कुठलीच दुर्भाग्यची गोष्ट नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.