बहुगुणी डेस्क, वणी: तिच्या पतीचे काही वर्षांआधी निधन झाले होते. त्यामुळे ती एकाकी जगत होती. अशातच तिच्या आयुष्यात तिच्यापेक्षा 10 वर्ष वयाने लहान असलेला एक तरुण आला. त्याने तिचा तसेच तिच्या मुलींचा सांभाळ करण्याचे वचन दिले. दोघेही एकत्र राहू लागले. मात्र तरुणाच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले व त्याने विधवा महिलेला बेदम मारहाण करीत तिच्यावर धारदार शत्राने हल्ला केला. झरी तालुक्यात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. या मारहाणीत विधवा महिला गंभीर जखमी झाली.
तक्रारीनुसार, पीडित महिला ही 35 वर्षीय असून ती झरी तालुक्यातील मारोती (पोड) या गावी राहते. तिच्या पतीचे 8 वर्षांपूर्वी निधन झाले. तिला पतीपासून दोन मुली आहे. शेती करून ती आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. पतीच्या निधनानंतर ती एकाकी जीवन जगत होती. अशातच तिची आरोपी लेतू सखाराम टेकाम (25) मुळचा रुडा ता. केळापूर येथील रहिवासी आहे. तो मजुरीचे काम करतो व गावातच राहतो.
महिलेची लेतूसोबत ओळख झाली. तो विधवा महिलेला शेतीचा कामात मदत करीत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने तिच्याशी लग्न करण्याचीही इच्छा व्यक्त केली व दोन्ही मुलींचा सांभाळ करण्याबाबतही वचन दिले. कुणीतरी आधार देतोय या भावनेतून महिला त्याच्या वचनांना भुलली. ते दोघे एकत्र राहू लागले. मात्र काही दिवसातच लेतूच्या मनात संशयाचे भूत घर करू लागले.
त्याला महिला ही कुण्या पुरुषाशी मोबाईलवरून बोलत असून तिचे परपुरुषासोबत संबंध आहे, असा संशय त्याला आला. त्यामुळे तो तिच्या चारीत्र्यावर संशय घेत होता. यातून दोघांत खटके उडायला सुरुवात झाली. मंगळवारी दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी महिला शेतातून घरी परत आली. दरम्यान लेतू घरी आला. त्याने तू कुणाशी मोबाईलवर बोलते असा जाब विचारत महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढून लेतूने महिलेचे केस पकडून तिला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. यात ती जखमी झाली. तसेच त्याने तिला अश्लिल शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने पाटण पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी लेतू सखाराम टेकाम याच्या विरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 351 (2), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पाटण पोलीस करीत आहे.
Comments are closed.